भाजपाला मोठा धक्का, दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात, माजी मंत्र्याचाही समावेश

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत
तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात सामना पाहावयास मिळणार आहे. या निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवारांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्री यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली. समरजित घाटगे तेथून लढण्यास इच्छुक होते, मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समरजीत घाडगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचे समजत आहे.
तसेच इंदापूर मध्ये ही विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान उद्या होणाऱ्या महायुतीच्या जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित असल्याचे बोललं जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक सूत्राने माहिती दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवारांची ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून गावभेट दौरे चालू आहेत. आज २१ ऑगस्ट रोजी हर्षवर्धन पाटील वाढदिवसानिमित्त इंदापूर मतदार संघात शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
