हर्षवर्धन पाटील यांना विधिमंडळात पाठवा, पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवा – शरद पवार

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
● इंदापूरच्या ऐतिहासिक पक्षप्रवेश सभेत विक्रमी गर्दी
● हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
● मलिदा गॅंगच्या भ्रष्टाचाराचा सभेत समाचार
● हर्षवर्धन पाटील यांचे उमेदवारीवर शरद पवारांचे शिक्कामोर्तब
इंदापूर, दि. ७ : हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कर्तृत्व, विविध क्षेत्राचा अभ्यास व प्रशासनाचा अनुभव आहे. मला राज्यातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान बदलायचे आहे. महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची उपयुक्तता शंभर टक्के आहे. या करता हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही विधानसभेत पाठवा, राज्यात पद देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवा असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर विधानसभा मतदार संघातून हर्षवर्धन पाटील यांचे उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
इंदापूर येथे राज्यातील ज्येष्ठ नेते माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शानदार प्रवेश सोहळा सोमवारी,
दि. ७ रोजी संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी, विविध संस्था, ग्रामपंचायती, सोसायटी दूध संस्था यांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, महिला यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी अंकिता पाटील ठाकरे ॲड शरद जामदार, राजवर्धन पाटील, लालासाहेब पवार, देवराज जाधव, मुरलीधर निंबाळकर, ॲड कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, ऋतुजा पाटील, प्रदीप पाटील आदींसह काही पदाधिकाऱ्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते.
एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले, असे हर्षवर्धन पाटील… असे भाषणाच्या प्रारंभी नमूद करत शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचे विषयी गौरव उद्गगार काढले. अतिशय समाधानाने मी या सभेसाठी आलो आहे, जेष्ठ नेते शंकररावभाऊ पाटील हे सन १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यावर विधिमंडळामध्ये व पुढे मंत्रिमंडळामध्ये माझे मार्गदर्शक होते. तसेच मंत्री म्हणून नेटके काम कसे करावे याचा आदर्श शंकरराव भाऊंनी दिला, भाऊंचा वारसा हर्षवर्धन पाटील पुढे चालवत आहेत.
ते पुढे म्हणाले, मला नेहमी वाटायचे हर्षवर्धन पाटील रस्ता चुकले आहेत, त्यांचा आजचा निर्णय हा इंदापूर एवढा मर्यादित नसून, राज्याला दिशा देणारा ठरणार आहे. हर्षवर्धन पाटील व आम्ही एकत्र काम करीत आहोत. ऊस व साखर उद्योग संदर्भात नेहमी आम्ही एक मताने निर्णय करत आहोत. विचारात कधी फरक पडला नाही, सहकार क्षेत्रात विश्वासाने नाव घ्यायचे म्हणले तर प्रथम नाव हर्षवर्धन पाटील यांचे डोळ्यासमोर येते. देशपातळीवरील साखर कारखाना संघटनेमध्ये हर्षवर्धन पाटील प्रमुख म्हणून काम करीत असल्याने, येथेही हर्षवर्धन पाटील यांची आम्हास मदत होत आहे, असे भाषणात शरद पवारांनी नमूद केले.
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, शाहू फुले आंबेडकरांचे विचार, बहुजनांचे विचार राज्यात रुजवण्याचे काम शरद पवार करीत आहेत. हर्षवर्धन पाटील यांना आमच्या पक्षात मोठे महत्त्व मिळणार आहे, त्यांना महाराष्ट्रात काम करावे लागेल. इंदापूरचे शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांना पेलायचे आहे. महायुती सरकारमध्ये निधी आणून 20 टक्के कमिशन घेतले जात आहे, अशा या भ्रष्ट सरकारपासून जनतेची सुटका करायची आहे.
हर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले, शरद पवार हे देशातील अभ्यासू नेते आहेत. त्यांना सर्व क्षेत्रातील प्रश्नांची जाण आहे. माझे काका शंकररावजी पाटील ( भाऊ ) यांच्या संस्कारक्षम नेतृत्वातून आम्ही कार्यकर्ते तयार झाला आहोत. मी पक्षप्रवेशाचा निर्णय हा व्यक्तिगत घेतलेला निर्णय नसून, इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी घेतला आहे. या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. शरद पवार हे आगामी काळात पक्षामध्ये जी जबाबदारी देतील ती यशस्वीपणे पार पाडू.
खासदार सुप्रिया सुळे भाषणात म्हणाल्या, हर्षवर्धन भाऊ मंत्री असताना इंदापूर तालुक्यात मोठी विकास कामे झाली आहेत. हर्षवर्धन भाऊंना शंकररावजी पाटील यांचा मोठा वारसा लाभला आहे. आजच्या सभेला महिला मोठ्या संख्येने आल्या आहेत. राज्यातील सध्याचे सरकार हे 40 टक्के कमिशन घेणारे सरकार आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी विजयाची, महाराष्ट्र धर्माची तुतारी हाती घेतल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी भाषणात राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अशोक घोगरे, सागर मिसाळ, तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार नारायण पाटील, विजयराव कोलते, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, अंकुश काकडे, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ॲड आशुतोष भोसले यांनी मानले. इंदापूरच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
● चौकट :
*इंदापूरची मलिदा गँग संपवा – शरद पवार*
मी प्रशासनामध्ये काम केल्या त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचे संबंध आहेत त्यांच्याकडून इंदापूर तालुक्यातील सध्याच्या कारभाराबद्दल मिळालेल्या माहितीवर चर्चा न केलेलीच बरी अलीकडे काहींनी इंदापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली आहे अशी टीका विद्यमान आमदारावर करत शरद पवारांनी भाषणात इंदापूरची मलिदा गॅंग संपवा असा हल्लाबोल केला.
*हर्षवर्धन पाटील बारामतीचे जावई आहेत – शरद पवार*
हर्षवर्धन पाटील हे बारामतीचे जावई आहेत. त्यांनी 32 वर्ष संसार चांगला, प्रगतीचा केला आहे. त्यामुळे त्यांना आता महाराष्ट्राचा संसार हा देखील नीट करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेवर पाठवा. असे नमूद करत शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे राज्यात मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिले.
*न भूतो न भविष्यती अशी सभा – जयंत पाटील*
हर्षवर्धन पाटील यांची पक्ष प्रवेशाची सभा ही न भूतो न भविष्यती असे होत आहे. या सभेतून विधानसभेचा निकाल काय लागणार आहे हे आता जाहीर झालेले आहे. असे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नमूद करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
*इंदापूरच्या इतिहासातील उच्चांकी गर्दीची सभा*
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या सभेला प्रचंड गर्दी झाल्याने नागरिकांना इमारतीवर चढून सभा ऐकावे लागले इंदापूरच्या इतिहासातील उच्चांकी गर्दीची सभा संपन्न झाली. या झालेल्या गर्दीचीच सर्वत्र चर्चा सुरू होती.
