ट्रस्ट ॲाडिट दाखल करण्याची मुदत ३० सप्टेंबर
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ३१ ते ३४ अन्वये नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे सनदी लेखापालांकडून (चार्टर्ड अकौंटंट) वार्षिक लेखापरीक्षण अहवाल (ॲाडिट रिपोर्ट) दरवर्षी ३० सप्टेंबर पर्यंत दाखल करायचे असतात. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपल्यावर सहा महिन्यांच्या आत हिशोबपत्रकांचे लेखापरीक्षण करणे अनिवार्य आहे. लेखापरीक्षण अहवाल आधी आयकर विभागाच्या पोर्टल वर ॲानलाईन सादर करावा लागतो. लेखापरीक्षण अहवाल अपलोड झाल्यावर त्याची ॲानलाईन पोहोच प्राप्त होते. त्यानंतर या ॲानलाईन पोहोचसह संपूर्ण लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय विभागाच्या वेबसाईट वर अपलोड करावा लागतो. त्याची सुद्धा ॲानलाईन पोहोच प्राप्त होते. अशा या ॲानलाईन पोहोच सह संबंधित ट्रस्ट जेथे नोंदणीकृत आहे अशा स्थानिक धर्मादाय कार्यालयात या अहवालाची कागदोपत्री प्रत दाखल करून त्यांवर दाखल केल्याचा सही शिक्का घ्यावा लागतो.
हा अहवाल दाखल करताना संस्थेला मिळालेल्या देणग्या हा महत्वाचा मुद्दा आहे. मागील आर्थिक वर्षात संस्थेला जर परकीय चलनात देणगी मिळाली असेल व एफ सी आर ए खाते असेल तर तिचा विनियोग कसा झाला आहे हे स्वतंत्रपणे नमूद करणे अनिवार्य आहे. भारतीय चलनात मिळालेल्या देणग्यांच्या वापराबाबतसुद्धा सखोल माहिती देणे गरजेचे आहे.
लेखापरीक्षण अहवालासोबत संस्थेच्या विश्वस्तांची पूर्ण नावे व त्यांचे पॅन क्रमांक नियमांतील परिशिष्ट ९ ड नुसार देणे आवश्यक आहे. त्याच बरोबर या अहवालामध्ये संस्थेच्या एकूण उत्पन्नाच्या किमान दोन टक्के अंशदान भरण्यासारख रकमेची तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे. अंशदान वसूलीचा विषय जरी सद्या उच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी त्याबाबत निर्णय झाल्यास संस्थेवर अचानक आर्थिक बोजा पडू नये म्हणून ही खबरदारी आवश्यक आहे.
——————————————————
धर्मादाय संस्थांनी नियत कालावधीत वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करून दंडात्मक कारवाई टाळणे योग्य होईल अन्यथा ती विश्वस्तांची अकार्यक्षमता समजली जाऊ शकते.
*ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार*
अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे
