बेकायदा गौणखनिज उत्खनन प्रकरणी आर.एस.कामठे कंपनीस ८ कोटी ७४ लाख रूपये दंड
इंदापूर च्या तहसीलदारांचा कंपनीस दणका!
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर:मौजे बिरुगुडवाडी(कळस)ता. इंदापूर येथील जमीन गट २५६ मध्ये आर.एस.कामठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा.लि.कंपनीने परवानगी पेक्षा जास्त गौणखनिज उत्खनन केले प्रकरणी ८ कोटी ७४ लाख ६५ हजार ६२५ रूपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.आर.एस.कामठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे बारामती ते इंदापूर पर्यंत काम करीत असून मौजे बिरुगुडवाडी येथील गट २५६ मध्ये जिल्हा खनिकर्म कार्यालय पुणे यांचेकडून ३००० ब्रासला उत्खनन व वाहतूक करणेकरिता ०१/११/२०२१ पासून ३०/११/२०२१ पर्यंत परवानगी देण्यात आलेली होती.आर.एस.कामठे यांना ३००० ब्रासला परवानगी असताना कंपनीने परवानगी पेक्षा जास्त गौणखनिज उत्खनन केले बाबत लेखी तक्रार अर्जदार यांनी तहसील कार्यालय इंदापूर यांचेकडे केलेली होती.त्यानंतर मंडल अधिकारी अंथूर्णे यांचेकडून स्थळ पंचनामा तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी पुणे यांचेमार्फत सदर गटाची ईटीएस मोजणी झाली व त्यामध्ये आर.एस.कामठे यांनी सदर गटात ३०,१७१ ब्रास गौणखनिज उत्खनन केलेचे निष्पन्न झाले.त्यानंतर मंडल अधिकारी अंथुर्णे व तहसिलदार इंदापूर यांचे दालनात वादी व प्रतिवादी यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सुनावण्या आयोजित केल्या होत्या.त्याअनुषंगाने अर्जदार व प्रतिवादी कंपनीने देखील त्यांचे लेखी म्हणणे सादर केलेले होते.
त्यामध्ये अर्जदार यांनी कंपनीने परवानगी पेक्षा जास्त उत्खनन केलेले असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदींचा तसेच तात्पुरता गौण खनिज परवानामधील अटी व शर्तींचे उल्लंघन केलेले असुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७),४८(८) नुसार तसेच खाण व खनिजे (विनियमन व विकसन) अधिनियम १९५७ चे कलम २१(४),२२,२३ नुसार कारवाई करण्यात यावी तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४,भारतीय दंड संहिता १८६० मधील योग्य त्या कलमान्वये उचित न्यायालयात खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती.
त्याअनुषंगाने तहसिलदार यांनी मंडल अधिकारी यांचा पंचनामा तसेच वादी व प्रतिवादी यांचे लेखी म्हणणे,गौणखनिज परवाना,रॉयल्टी चलने इत्यादी कागदपत्रे विचारात घेता कंपनीने जिल्हा खनिकर्म शाखा पुणे यांचा दिनांक ०१/११/२०२१ रोजी ३००० ब्रास उत्खननाचा आदेश घेतलेला आहे.सदर आदेशाची मुदत ३०/११/२०२१ पर्यंत होती.त्यानंतर कोणताही उत्खनन परवाना घेतले बाबतचा कोणताही अधिकृत पुरावा या कार्यालयास कंपनीने सादर केलेला नाही.सबब सदर परवानगी प्राप्त उत्खनन व रॉयल्टी भरणा केलेले परिमाण व्यतिरिक्त इतर उत्खनन अवैध समजणे क्रमप्राप्त आहे.तसेच ईटीएस मोजणी पाहता ३०१७१ ब्रास उत्खनन झाल्याचे दिसून येते.त्यापैकी आर.एस.कामठे कंपनीने २२०४६ ब्रास एवढी रॉयल्टी भरलेचे चलनावरून दिसून येते.ईटीएस मोजणी वजा जाता ८१२५ ब्रास रॉयल्टी शिल्लक भरणेचे दिसून येते.
फरकाची रॉयल्टी कंपनीने ईटीएस मोजणी झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत भरणे बंधनकारक असताना अद्यापपर्यंत भरणा केल्याचे दिसून येत नाही.आर.एस.कामठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा.लि.कंपनीने शिल्लक रॉयल्टी ८१२५ ब्रास गौणखनिज उत्खनन वैध असल्याचे पुरावे, परवान्याची कागदपत्रे,चलने सादर केली नाहीत.तसेच बिरुगुडवाडी गट नंबर २५६ गौण खनिज उत्खननाकरिता खाणकाम आराखड्यामध्ये समावेश केल्याचे दिसून येत नाही.कंपनीने बिरुगुडवाडी गट नंबर २५६ मधील अधिकचे गौणखनिज उत्खनन वैध असलेबाबत मंजूर खाणकाम आराखडा प्रत,उत्खनन परवाना,खाणपट्टा व इतर कोणतेही पुराव्याचे कागदपत्रे सादर न केल्याने सदर गौणखनिज उत्खनन अवैध असल्याचे निदर्शनास आल्याने आर.एस.कामठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा.लि.कंपनीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) नुसार ८ कोटी ७४ लाख ६५ हजार ६२५ रूपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.व सदरची दंडाची रक्कम १५ दिवसाच्या आत सरकारी खजिन्यात भरणेबाबत आदेशित करण्यात आलेले आहे.
चौकट :
बिरुगुडवाडी(कळस)सजाचे तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे तसेच संबंधित कंपनीने बिरुगुडवाडी (कळस)येथील २५६ जमीन गटातून अवैधरीत्या परवानगी पेक्षा जास्त गौणखनिज उत्खनन शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने केलेले असुन त्यांचेवर शासनाच्या आदेशाची अवज्ञा केलेप्रकरणी व शासनाची फसवणूक केलेप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत व तात्काळ दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी. – तक्रारदार:-राहुल बोबडे, पांडुरंग मोहिते.
