Thu. Apr 23rd, 2026

कळंब – वालचंदनगर परिसरात ‘वीजेचा लपंडाव’…महावितरणाने वेळीच सुधारणा करावी…अन्यथा कार्यालयास ‘घेराव’ घालून ‘धरणे आंदोलन’ – तानाजीराव थोरात

Spread the love

कळंब – वालचंदनगर परिसरात ‘वीजेचा लपंडाव’…महावितरणाने वेळीच सुधारणा करावी…अन्यथा कार्यालयास ‘घेराव’ घालून ‘धरणे आंदोलन’ – तानाजीराव थोरात

शिव-कल्याण न्युज नेटवर्क

दि.13. गेल्या आठ-दहा दिवसापासून वालचंदनगर – कळंब परिसरातील गाव व वाड्या वस्त्यांवर दिवसातून सात ते आठ वेळा वीज घालविली जाते त्यामुळे या परिसरातील ग्रामीण व निमशहरी भागात वीज नसल्याने लोकांचे अतोनात हाल सुरू आहेत.
विजेचा हा लपंडाव पहाटेपासून सुरू होतो तो संध्याकाळपर्यंत सुरू असतो कधी तास अर्धा तास, पंधरा-वीस मिनिटे कधी दोन ते तीन तास गेलेली वीज येतच नाही. सध्या या भागामध्ये उन्हाचा कहर वाढत असून दिवसाचे तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस इथपर्यंत जात आहे. वाढत्या उन्हामुळे आधीच लहान मुले, वृद्ध माणसे, आजारी माणसे यांना अतोनात त्रास होतो तशातच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तो त्रास अधिकचा वाढतो.

सध्या विविध शाळांच्या इयत्ता पाचवी ते अकरावी ( इयत्ता दहावी व बारावी सोडून ) या वर्गांच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत त्यामुळे मुलांना संध्याकाळी अभ्यासासाठी विजेची अत्यंत गरज आहे असे असतानाही महावितरण कडून विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक गैरसोय केली जात आहे. वीज पुरवठा बे – भरवशाचा झाला असल्यामुळे ग्रामीण भागात मधील नळ पाणीपुरवठा योजनेच्या मोटारी, पिठाच्या गिरण्या बंद राहत असल्याने लोकांची पिण्याच्या पाण्याची तसेच हातावर पोट असणाऱ्यांची गिरणीतून दळण दळण्याची खूपच मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हाचा त्रास आणि त्यातून वीज नसल्याने पंखे फिरत नाहीत त्यामुळे घरी आजारी असलेले तसेच दवाखान्यामध्ये दाखल असलेले रुग्ण तसेच लहान मुले यांनाही या प्रकाराने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्याकडे विचारणा केली असता,” आमच्याकडून वीज गेलेली नाही वरूनच वीज पुरवठ्यामध्ये खंड निर्माण होत आहे ! ” असे उत्तर देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत आहे. वीज वारंवार खंडित होण्याचा प्रकार एक दोन दिवस झाला असता तर लोकांनी महावितरणची अडचण समजून घेतली असती परंतु हा प्रकार सातत्याने गेले आठ-दहा दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे वीजेवर अवलंबून असणाऱ्या लोकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वीज पुरवठ्याच्या बाबतीत महावितरणने वेळीच सुधारणा न केल्यास गावोगावीचे लोक व पक्षाचे कार्यकर्ते संघटित करून महावितरणच्या कार्यालयास घेराव घालण्याचे व धरणे धरून बसण्याचे आंदोलन सुरू केले जाईल ! असा इशारा भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा सचिव तानाजीराव थोरात यांनी दिला आहे.

Related Post

error: Content is protected !!