Thu. Apr 23rd, 2026

धार्मिकते सोबत समाजसेवा ~ १२५ वर्षांची श्रद्धेय परंपरा

Spread the love

*धार्मिकते सोबत समाजसेवा ~ १२५ वर्षांची श्रद्धेय परंपरा*

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

*मंदिराचा इतिहास*
पुण्याच्या धार्मिक परंपरेमध्ये अग्रस्थानी असलेले श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आज १९ जून रोजी १२५ व्या वर्षात दिमाखदार पदार्पण करत आहे. मंदिर स्थापनेचा इतिहास अभ्यासायचा तर असे सांगता येईल की श्रीमान दगडूशेठ व त्यांच्या धर्मपत्नी सौ. लक्ष्मीबाई सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पुणे शहरातील एक श्रद्धाळू, सत्शील, सधन, दानशूर व परोपकारी दांपत्य होते. श्रीमान दगडूशेठ हे नामांकित पहिलवान होते. त्यांचा मिठाईचा फार मोठा व्यवसाय होता. भारतीय जनक्रांतीचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व तत्कालीन अन्य स्वातंत्र्य सैनिकांशी श्रीमान दगडूशेठ यांच्यासोबत अत्यंत सौहार्दाचे संबंध होते. भारतीय स्वातंत्र्य समराचा एक महत्वाचा कालखंड या कुटुंबाशी निगडीत आहे.

पुण्यातील १०९८ बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच श्रीमान दगडूशेठ व त्यांच्या धर्मपत्नी सौ. लक्ष्मीबाई या दांपत्याची रहावयाचा वाडा होता. कालगतीने सन १८९७ साली दगडूशेठ यांचे निधन झाले. त्यांचे पश्चात योगी माधवनाथजींनी श्रीमती लक्ष्मीबाई यांना उर्वरीत जीवन कालात श्री दत्त उपासना करण्याचा उपदेश केला. त्यांनी जयपूर येथून संगमरवरी श्री दत्त मुर्ती तयार करून घेतली व श्रीमती लक्ष्मीबाईंच्या निवासस्थानी मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना स्वतः ज्येष्ठ वद्य षष्ठी म्हणजेच ६ जून १८९८ रोजी संपन्न केली. तेंव्हापासून आज पर्यंत अनन्यसाधारण धार्मिक विभुती श्री दत्त महाराजांची उपासना व सेवा करायला या मंदिरात येत असतात. पुण्यातील धनकवडी येथे समाधिस्त श्री शंकर महाराज यांचे श्री शंकर लीला या चरित्रग्रंथात या दत्त मंदिराचा उल्लेख आहे. दास गणू महाराजांना एकादशीचे किर्तन करताना येथे श्री दत्त मुर्ती मध्ये पंढरीच्या विठुरायाचे दर्शन झाले. अशाप्रकारे देश परदेशातील भाविकांचे हे दत्तमंदिर एक महत्त्वपूर्ण श्रद्धास्थान आहे.

*दातृत्वाचा गौरव*
लक्ष्मीबाईंनी आपल्या हयातीत मोठा दानधर्म करून आपले लक्ष्मी हे नाव सार्थ केले. त्यांच्या या परोपकारी कार्यपालकत्वाची उचित दखल घेऊन पुण्याची मुख्य बाजारपेठ व सांस्कृतिक शान असलेल्या रस्त्याला ‘लक्ष्मी रस्ता’ हे नामकरण लक्ष्मीबाईंचा बहुमान म्हणून करण्यात आले आहे.

*ट्रस्टची स्थापना*
श्रीमती लक्ष्मीबाई यांनी आपल्या हयातीत त्यांचे राहते घर दत्त मंदिराचे व्यवस्थापन करण्यासाठी दान करून एक नियमावली तयार केली. परिसरातील प्रसिद्ध कै. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई यांचे अधिपत्याखाली एक पंचसमिती नियुक्त केली होती. कालांतराने ट्रस्ट नोंदणीचा कायदा लागू झाल्यावर २५ मार्च १९५२ रोजी या मंदिराची सार्वजनिक मंदिर म्हणून पुण्याच्या धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी करण्यात आली. तेंव्हापासून पुण्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त समाजातील सर्व घटकांमधून पाच वर्षांसाठी या ट्रस्टच्या नऊ विश्वस्तांची नेमणूक करत असतात.

*मंदिराचे निर्माण*
सन २००६ साली पुरातन वास्तुचा सर्वात मोठा जिर्णोध्दार सुरू करण्यात आला. शिखराचे बांधकाम झाल्याने मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले. १४ मे २००७ रोजी श्री दत्त मुर्तीची विधिवत पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. ५ जुलै २००८ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे शुभहस्ते राजभवन येथे पूजन करून कलशारोहण करण्यात आले.

*ट्रस्टचे समाजकार्य*
ट्स्टच्या विश्वस्तांनी ‘धार्मिकते सोबत समाजसेवा’ हे ब्रीद अंगीकारले असून महिला व बालकल्याण, युवती सबलीकरण, शिक्षा छात्रवृत्ती, पर्यावरण रक्षण आदी मानवतावादी कार्य खूप मोठ्या प्रमाणावर करत आहेत. मंदिराच्या जवळच देहविक्रय करणाऱ्या अभागी भगिनींची मोठी वस्ती आहे. मंदिराजवळच ट्रस्टची आणखी एक वास्तू आहे. तेथे स्वाधार संस्थेच्या माध्यमातून या वस्तीतील मुलांची रात्र निवाऱ्याची व शिक्षणाची सोय करण्यात येत होती. येथे राहिलेली अनेक मुले आज डॅाक्टर, इंजिनियर आदी उच्च शिक्षित झाली असून अजूनही ट्रस्ट सोबत ऋणानुबंध जोपासले आहेत.

करोना काळात या ट्रस्टद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर गरजूंना अन्नदान सेवा करण्यात आली. लॅाकडाऊन काळामध्ये मध्ये पुणे शहरात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या हजारो विद्यार्थ्यांना ‘दत्तप्रसाद’ अभियानांतर्गत ट्रस्ट द्वारे मोफत भोजन सेवा देण्यात आली. लॅाकडाऊन व नंतरही वस्तीतील पीडित महिलांना ट्रस्टचे सेवेकरी जागेवर भोजन पुरवत होते. नुकतेच ‘लक्ष्मीबाई अभ्यासिके’ चे लोकार्पण करण्यात आले आहे. आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी येथे अभ्यासाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘दत्तछात्रवृत्ती’ माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येते.

मंदिर परिसर हा मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता असा पुण्याच्या मुख्य बाजारपेठेमुळे सदा व्यस्त असतो. येथे खरेदीसाठी येणाऱ्या स्तनदा मातांसाठी ट्रस्टने महाराष्ट्रामध्ये मंदीरात ‘अनसुया स्तनपान कक्षाची’ सुविधा सर्वात प्रथम सुरू केली आहे.

अनाथ बालके व महिलांचा सांभाळ करणाऱ्या, वंचित कन्यांना शिक्षणाद्वारे स्वावलंबी जीवन जगण्यास आधार देणाऱ्या तसेच क्रिडा नैपुण्य, पर्यावरण संवर्धन, संशोधन कार्यरत उद्यमशील अशा तीन महिलांना मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांची स्मृती चिरंतन स्मरणात रहावी यासाठी प्रतिवर्षी ‘लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. त्याचप्रमाणे अध्यात्मिक, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रात उत्तुंग योगदान असलेल्या गुरुजनांचा ‘गुरूमहात्म्य पुरस्कार’ प्रदान करून गौरवसोहळा साजरा करण्यात येतो.

ट्रस्टद्वारे वर्षाभरात स्थापना दिन, गुरुपौर्णिमा व दत्तजयंती हे तीन मोठे उत्सव साजरे केले जातात. यावेळी होणाऱ्या सप्ताहामध्ये ‘दत्त कला मंच’ द्वारे मंदिरासमोरील उत्सव मंडपामध्ये भजन, किर्तन, भक्तिगीत व भावगीत गायन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उदयोन्मुख कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोफत व्यासपीठ उपलब्ध करून उचित मानधन देखील देण्यात येते. ‘सप्तस्वरोत्सव’ आयोजित करून देशभरातील नामवंत कलाकारांच्या संगीत व सांस्कृतिक सेवेचा रसिक प्रेक्षकांना मोफत आस्वाद घेता येतो.

नुकतेच २७ मे २०२२ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात भारताचे महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या शुभहस्ते मंदिर स्थापनेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शानदार शुभारंभ झाला. या समारोहास देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद भुतपूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजितदादा पवार व शासनाचे प्रतिनिधी दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. हा अविस्मरणीय सोहळा लाखो भाविकांनी दृकश्राव्य माध्यमातून अनुभवला.

या ट्रस्टला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा व भाविकांच्या येणाऱ्या असंख्य पिढ्यांना श्री दत्त महाराजांचे शुभाशीष लाभावेत ही मनोकामना.

*ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार*
कार्यकारी विश्वस्त

Related Post

error: Content is protected !!