विना वाद बदल अर्ज विशेष मोहिमेस तीस डिसेंबर पर्यंत वाढ
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
बिनविरोध बदल अहवाल लवकर निकाली काढण्यासाठी विशेष अभियानास राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी तीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सद्या तेरा ते चोवीस डिसेंबर पर्यंत असलेला हा दोन आठवड्यांचा कालावधी आणखी एका आठवड्याने वाढवला आहे.
या बाबत पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मुकेश परदेशी म्हणाले की संपूर्ण राज्यातील धर्मादाय उपायुक्त व सहाय्यक आयुक्त हे या कालावधीत त्यांचे कार्यतालिकेवर असलेले सर्व बिनविरोध बदल अहवाल निकाली काढण्यासाठी या अभियानांतर्गत कार्यरत असतील.
ॲड. राजेश ठाकूर यांनी सांगितले की अशा सर्व बिनविरोध बदल अहवालांची यादी कार्यालयीन सुचना फलकावर प्रदर्शित केल्यामुळे वकिलांना व पक्षकारांना देखील याची माहिती उपलब्ध झाली आहे. ॲड. सतिष पिंगळे यांचेनुसार केवळ विश्वस्त बदलाचेच नाही तर ट्रस्टच्या स्थावर मिळकतींची नोंद घेण्याचे बदल अहवाल देखील सर्व कागदोपत्री पूर्तता झाली असेल तर तेसुद्धा आदेशासाठी घेता येतील.
उपाध्यक्ष ॲड. मोहन फडणीस यांनी हे बदल अहवाल निकाली काढत असताना संबंधित वकिलांना माहिती देऊन मगच पुढे आदेशास्तव प्रकरणे घ्यावीत अशी मागणी केली.
ॲड. ज्ञानेश शहा म्हणाले की या मोहिमेमुळे पक्षकार स्वतःहून सहकार्य करण्यास पुढे येत आहेत. तर ॲड. दिगंबर देशमुख यांनी सांगितले की ग्रामीण भागातील पक्षकारांना या अभियानाची माहिती उशीरा मिळाली. त्यामुळे या वाढीव कालावधीचा त्यांना निश्चित फायदा होईल.
सचिव ॲड. सुनिल मोरे यांचे म्हणण्यानुसार या विशेष अभियाना दरम्यान वकील व पक्षकारांनी सकारात्मक भूमिका ठेवली तर पुणे विभाग असे बदल अहवाल निकाली काढण्या राज्यात अग्रेसर राहील.
विभागीय सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के या विशेष अभियाना बाबत त्यांना अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
———————————————————–
विशेषतः ज्या ट्रस्टचे विनावाद बदल अहवाल अजूनही प्रलंबित असतील अशा विश्वस्तांनी या वाढीव कालावधीचा लाभ घेऊन प्रलंबित बिनविरोध बदल अहवाल निकाली काढण्यास आपल्या वकिलांशी त्वरित संपर्क साधावा.
ॲड. शिवराज प्र कदम जहागिरदार
अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे
