बिनविरोध बदल अहवालांसाठी विशेष अभियान
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुमारे साडे सत्तेचाळीस हजार वाद नसलेले बदल अहवाल प्रलंबित आहेत. याबाबत राज्यातील सर्व विभागातील सह धर्मादाय आयुक्तांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे चर्चा करण्यात आली. त्यानुसार राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी एका पत्रकाद्वारे तेरा ते चोवीस डिंसेबर या दोन आठवड्यांच्या कालावधीत एक विशेष अभियान आयोजित केले आहे. संपूर्ण राज्यातील धर्मादाय उपायुक्त व सहाय्यक आयुक्त हे या कालावधीत त्यांचे कार्यतालिकेवर असलेले सर्व बिनविरोध बदल अहवाल निकाली काढण्यासाठी या अभियानांतर्गत कार्यरत असतील. अशा सर्व बिनविरोध बदल अहवालांची यादी कार्यालयीन सुचना फलकावर प्रदर्शित करण्या येईल. तसेच प्रत्येक कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना देखील हे विशेष अभियान यशस्वी करण्यास सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व विभागीय सह धर्मादाय आयुक्त या अभियाना बाबत त्यांना अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अभियान कालावधीत दररोज सायंकाळी साडेपाच वाजता प्रत्येक सह धर्मादाय आयुक्त हे त्यांचे विभागातून निकाली निघालेल्या बिनविरोध बदल अर्जांचा दैनंदिन अहवाल देणार आहेत. या कालावधीत कोणत्याही अधिकाऱ्यांना रजा मंजूर करण्यात येऊ नये असेही या पत्रकात नमूद केले आहे.
———————————————————-
झिरो पेंडन्सीच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सर्व विश्वस्तांनी या संधीचा लाभ घेऊन प्रलंबित बिनविरोध बदल अहवाल निर्णित करून घ्यावेत. या प्रक्रियेत दृकश्राव्य प्रणालीचा वापर केल्यास परगावचे किंवा वृद्ध व अपंग पक्षकारांना त्याचा लाभ होईल.
ॲड. शिवराज प्र कदम जहागिरदार
अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे
