वायुवेग पथकाकडून वाहनांची तपासणी
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे, दि. 21:- पिपंरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाकडून पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत असून संभाव्य कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनधारकांनी मोटार वाहन कर, वाहनाचा पर्यावरण कर विहीत मुदतीत भरणे तसेच वाहनाचे विधिग्राह्य विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र यासह वाहनाच्या संबंधित इतर सर्व कागदपत्रे मुदतीत असल्याबाबत वाहनधारकांनी खात्री करावी.
पुणे-मुंबई महामार्गावर वायुवेग पथकाकडून लेन कटींग, सीट बेल्ट न घालणे,वेग मयादेचं उल्लंघन करणे, अवैध पार्किंग इत्यादी गुन्ह्याची तपासणी केली जात असून वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहन कर व दंड भरून सोडवून न घेतल्यास अशा वाहनांचा लिलाव करण्याची कार्यवाहीदेखील करण्यात येत असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.
