मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा बंगला जमीनदोस्त!
माजी खासदार किरीट सोमय्या यांची तक्रार
सचिन तरंगे
(शिव कल्याण न्यूज नेटवर्क)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील निर्माणाधीन बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा दापोली मुरुड समुद्रकिनारी असलेला बंगला तोडण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे मुरुड समुद्रकिनारी CRZ नियमांचं उल्लंघन करुन हा बंगला बांधल्यानं ही कारवाई केली गेली.
परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत अखेरीस रविवारी या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. नार्वेकर यांच्या बंगल्यावरील कारवाई हा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दणका आहे.
राज्यात महविकास आघाडीची सत्ता असूनही मनमानी करता येत नाही हेच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दाखवून दिले आहे.
मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला होता. हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यातआले. जेसीबी मशीन लावून हा बंगला तोडण्यात आला आहे. या बंगल्याची प्रत्येक भिंत न् भिंत पाडण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत. दरम्यान, आज नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी तसं ट्विटच केलं आहे.ते ट्विटच आज दिवसभर मीडियावर चर्चेत आहे.
नार्वेकर यांच्या बंगल्याप्रकरणी सोमय्या यांनी आरोप केले होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर 72 गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
एका बाजूला कोव्हिडमुळे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्याच वेळेला शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात भव्य रिसॉर्ट आणि बंगले बांधत आहेत. असे असताना सरकार मात्र या दोघांना पाठीशी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.
सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. ही सर्वात मोठी कारवाई असून आता मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट वरील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
