पुणे धर्मादाय कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू , वकील संघटनेच्या प्रयत्नाला यश
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे विभागीय धर्मादाय कार्यालय आता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. पुणे विभागात पुण्यासह सातारा, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांच्या समावेश होत असल्याने येथे न्यायिक कामकाजाचा भार खूप मोठा आहे. कोविड काळात या कार्यालयाने अनेक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वैद्यकीय तसेच गरजूंना संसारोपयोगी मदत देण्याचे मोठे कार्य केले आहे. शासकीय कार्यालयात पन्नास टक्के कर्मचारी उपस्थितीचा आदेश असल्याने या नियमावलीनुसार कर्मचारी संख्येवर निर्बंध आले होते. त्यामुळे सह आयुक्तांसह उपायुक्त व तीन सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या न्यायिक कामकाजावर खूपच मर्यादा आल्या होत्या.
येथील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने पाच जुलै रोजी सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांना निवेदन देऊन पुणे कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्याबाबत विनंती केली होती. उपरोक्त शासकीय निर्बंध आदेशात कार्यालय प्रमुखांना आवश्यकता वाटल्यास ते जिल्हाधिकारी म्हणजेच आपत्ती निवारण आधिकाऱ्यांशी संपर्क करून संबंधित शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढ करून घेऊ शकताता हा मुद्दा अधोरेखित केला होता. त्यानुसार सह आयुक्त बुक्के यांनी संबंधित सर्व शासकीय नियमांनुसार व मुंबई येथील मुख्यालयात धर्मादाय आयुक्तांशी चर्चा करून शुक्रवारी कार्यालयीन आदेश क्रमांक १७४ निर्गमित करून पुणे विभागीय कार्यालय दोन ॲागस्ट पासून पूर्ण क्षमतेने सुरू केले.
______________________________
वकीलांना सकारात्मक कामकाज करण्याच्या दिशेने व पक्षकारांच्या हितासाठी हा समाधानकारक निर्णय असून वकीलवर्गातर्फे याचे मन:पूर्वक स्वागत करून सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांचे ऋणनिर्देश करत आहे.
*ॲड. शिवराज प्र कदम जहागिरदार*
अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने, पुणे
