महाराष्ट्रभूषण पुरस्कार हे घरच्यांकडून झालेले कौतुक –
आशा भोसले
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
मुंबई : ‘आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असले तरी ‘महाराष्ट्रभूषण’ हा पुरस्कार वेगळा आहे.
कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे.
हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे असे मी मानते,’
अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘करोनाचे संकट अजून संपलेले नाही.
त्यात गेल्या आठवडय़ात चिपळूण, सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान झाले आहे.
त्यामुळे राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सन्मान सोहळा आयोजित करावा,’
अशी विनंतीही त्यांनी केली.
राज्य सरकारचा २०२० चा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे.
त्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी संगीतकार राहुल रानडे,
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या पुरस्कारासाठी आशाताईंची एकमताने निवड करणे,
हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.
देशमुख यांनी या वेळी आशा भोसले यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र,
त्यांच्या कारकीर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ हे पुस्तक,
‘लोकराज्य’चा अंक भेट म्हणून दिला.
राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार सोहळा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येईल,
अशी माहितीही देशमुख यांनी दिली.
