जलप्रलय!शेकडो लोक पुरात अडकले राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला
चिपळूण, महाडला पुराचा वेढा;
बदलापूरही जलमय कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात दाणादाण रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका;
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली.
कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली.
विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली.
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला.
बुधवारी रात्रभर झालेली अतिवृष्टी, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती या तिन्ही घटनांच्या एकत्रित परिणामाने गुरुवारी चिपळूण शहर जलमय झाले.
चिपळूण मुख्य बाजारपेठेत सकाळी ११ वाजता १० फूट पाणी होते.
शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले असून, काही ठिकाणी पहिल्या मजल्यांवरील घरांमध्येही तीन ते चार फूट पाणी भरले.
अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले.
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत तालुक्यात तब्बल २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत.
चिपळूणमध्ये दोन महिला पाण्यात बुडाल्या.
त्यातील एकीचा मृत्यू झाला असून,
दुसरी महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुराच्या पाण्यात असंख्य दुचाकी-चारचाकी गाड्या वाहून गेल्या.
रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीने झोडपले.
सावित्री, गांधारी, काळ आणि नागेश्वरी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराला पुराने वेढा घातला.
बाजारपेठेत आठ ते दहा फूट पाणी होते.
