केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा सुतार समाजाने लाभ घ्यावा – प्रदिप कल्याणकर
संदिप सुतार ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

सुतार समाज हा समाजातील एक महत्वाचा घटक म्हणून मान असलेला समाज म्हणून प्रत्येक गावात ओळखला जातो.मात्र असे असले तरी तो गेल्या कित्येक वर्षांपासून कष्ट दायी जिवन जगत आहे.याचे कारण त्यांचे पारंपरिक व्यवसाय आज मोडकळीस आले आहेत.त्यामुळे यातून पुढे जाण्यासाठी व नवीन व्यवसाय उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्येकाने लाभ घ्यावा,असे आवाहन प्रदीपकुमार कल्याणकर गुरुजी यांनी केले.
लासुर्णे (ता.इंदापूर) येथे दि. 1 सप्टेंबर रोजी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ, इंदापूर तालुकाच्या वतीने तालुका बैठकीचे आयोजन करण्यात आले, यावेळी कल्याणकर गुरुजी बोलत होते. या बैठकीस तालुकाध्यक्ष विजय सुतार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार संदीप सुतार, विजय क्षीरसागर, पिंपरीचे उपसरपंच संतोष सुतार, डॉ.सुधीर कल्याणकर, नीरा नृसिंहपुरच्या माजी सरपंच अनिता जगदीश सुतार आदींसह तालुक्यातील समाजबांधव व महिला भगिणी उपस्थित होते.
कल्याणकर पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील सुतार समाज हा मानाने व मनाने खुप मोठा असला तरी आर्थिक परिस्थितीने फारच मागासलेला आहे.याचे कारण म्हणजे त्यांच्या पारंपरिक व्यवसायावर झालेले व्यवसायिक अतिक्रमण आहे.त्यामुळे अनेकांनी इतर खाजगी नोकरी करून आपले पोट भरतात तर काही येईल त्या कामावर. मात्र यांत्रिक युगात वावरताना आपणही यांत्रिकीकरणाचा हिस्सा व्हावेच लागेल. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना कार्यान्वित आहेत.या योजनांचा लाभ तालुक्यांतील प्रत्येक सुतार कुटुंबाने घ्यावा त्यासाठी योग्य मार्गदर्शन व सूचना आपल्या संघटनेच्या माध्यमातून दिल्या जातील , असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत तालुक्यातील सुतार समाजाची जनगणना करण्याचे आवाहन अध्यक्ष विजय सुतार यांनी यावेळी केले.तसेच जनगणनेचे अर्जवाटप कार्यकर्त्यांकडे करण्यात आले.या अर्जावर प्रत्येक कुटुंबाची माहिती भरून १५ सप्टेंबर पर्यंत तालुका कार्यालयात जमा करावेत असे सुतार यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार संदीप सुतार, उपसरपंच संतोष सुतार, सेवानिवृत्त प्रा.दशरथ सुतार,ऍड.पवार आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तर आभार विजय कल्याणकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित सुतार, अंकुश मोरे, सोमनाथ सुतार आदींनी प्रयत्न केले.
