रेडणीत “पिण्याच्या पाण्याचा टँकर” सुरु!
खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना यश

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
मौजे रेडणी (ता इंदापूर )या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ‘गंभीर निर्माण झाला आहे. रेडणीत टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांमार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे यांनी बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कडे केली होती.
या रेडणी गावामध्ये आज पासून पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू झाला आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरध्वनी वरून इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांना रेडणी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून आपल्या स्तरावरून तातडीने रेडणी गावात टँकर सुरु करावा अशा सूचना दिल्या होत्या,त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दाखल घेऊन रेडणी गावात टँकर सुरु केला आहे, अशी माहिती अमोल मुळे यांनी दिली.
रेडणीत पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु झाल्याने ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या गटाचे पदाधिकारी यांनी खासदार सुप्रिया सुळे, इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांचे आभार मानले.
