Sat. Apr 18th, 2026

२५ वर्षानंतर, भुदरगडात भरगच्च ग्रामीण साहित्य संमेलन

Spread the love

२५ वर्षानंतर, भुदरगडात भरगच्च ग्रामीण साहित्य संमेलन

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )सचिन तरंगे :

शाश्वत विकास चळवळ, गारगोटी- कोल्हापूर ही गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळात  जन्माला आली आणि फोफावली. मानवाच्या बेताल  आणि बेजबाबदार भौतिक विकासाच्या हव्यासापोटी केलेली अपरिमित जंगलतोड आणि अमर्याद प्रदूषण याला आळा घालून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे अस्तित्व टिकविण्यासाठी माणसाच्या गरजा कमी आणि नेमक्या असाव्यात  यासाठी व्यापक जनजागरणाचे काम करत आहे.

चळवळीने गेल्या  दीड वर्षांमध्ये  मडिलगे खुर्द हे गाव  ‘शाश्वत विकास ग्राम’ म्हणून दत्तक घेतले. गेल्या दीड वर्षात    ग्रामस्थांच्या मदतीने गावात आरोग्य, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, शेती आणि पर्यावरण या  समाजाच्या पाच प्रमुख गरजां संबंधी  जनजागरणाचे अनेक उपक्रम घेण्यात आले. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडही करण्यात आली.

याचाच एक भाग म्हणून गावात आणि परिसरात वाचन व लेखन संस्कृती वाढीस लागावी, नवोदित लिहित्या हातांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि संधी मिळावी म्हणून शाश्वत विकास चळवळीची भगिनी संस्था अक्षरसागर साहित्य मंच, गारगोटी यांच्या वतीने मडिलगे खुर्द येथे ‘अक्षरसागर’ चे पहिले ग्रामीण साहित्य संमेलन १४ एप्रिल रोजी भरविण्यात आले.

साहित्य संमेलन भरविणे ही तशी फारच खर्चिक आणि मोठ्या नियोजनाची बाब. पण शाश्वत विकास चळवळीकडे मनुष्यबळाची, शुभचिंतकांची आणि दानशूर हातांची कोणतीच कमतरता नसल्यामुळे संमेलनाचं नियोजन आणि आयोजन अतिशय उत्तम पद्धतीनं पार पाडलं गेलं. साहित्यिक आणि साहित्य रसिकांचा मिळालेला भरभरून प्रतिसाद आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मिळालेल्या भरभरून प्रतिक्रीया पाहिल्यानंतर ‘अक्षरसागर’ चं हे आयोजन निश्चितच अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल.

गेले दोन महिने चाललेल्या या तयारीमध्ये शाश्वत विकास चळवळ, अक्षरसागर साहित्य मंच, गारगोटी, प्रोफेशनल ग्रुप व ज्येष्ठ नागरिक संघ गारगोटीचे सर्व कार्यकर्ते आणि मडिलगे खुर्दचे सर्व ग्रामस्थ अविरतपणे कार्यरत होते.

‘अक्षरसागर’ २०१८ या स्थापना वर्षापासूनच उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, भुदरगड साहित्यभूषण पुरस्कार देत आहे. मंचाची निपक्षपाती मूल्यमापन पद्धती सर्व ज्ञात असल्यामुळे महाराष्ट्रभरातून नवोदित मराठी साहित्यिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मडिलगे खुर्द गावामध्ये हे साहित्य संमेलन घेण्याचा मानस बोलून दाखवल्यावर मडिलगेकरांच्या चेहऱ्यांवरचा आनंद पाहण्यासारखा होता. सरपंच गौरी खापरे, माजी उपसरपंच सुरेश खोत, बाबुराव खापरे, सुखदेव मगदूम आणि त्यांचे उत्साही जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांनी तत्काळ संमेलन मडिलगे गावातच घ्यायचं हे निश्चित केलं आणि सर्वजण झपाटून कामाला लागले.

अक्षरसागरचे अध्यक्ष राजन कोनवडेकर, डॉ मा ग गुरव, डी व्ही कुंभार, बाजीराव जठार, राणी हुजरे हे सर्व सदस्य, ‘शाश्वत’ चे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, सचिव आनंद चव्हाण आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्राचार्य बी एस माने, यशवंत सरदेसाई यांच्या नियोजनाच्या बैठका झडू लागल्या. कधी गारगोटीत तर कधी मुरगूडात.

मंचचे सल्लागार मंडळाचे सन्माननीय सदस्य मा. ज्ञानेश्वर मुळेसो(IFS), मा. कुलदीप राजे(IRS), उद्योजक मा विनायक राऊत, चित्रकार राजन कुंभार, ज्येष्ठ साहित्यिक पांडुरंग पुंडपाळ यांचंही संमेलन आयोजनात वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं.

कोरोनाचा अंदाज घेत प्रथम १० एप्रिल तारीख निश्चित झाली आणि नंतर काही कारणांमुळे ती १४ एप्रिल करावी लागली. अनेक साहित्यिकांना फोन झाले. सर्वांच्या सोयीच्या तारखा आणि वेळा निश्चित करण्यात पंधरा दिवस मागे पडले. अनेक साहित्यिकांना एकत्र आणणे हा एक मोठा विलक्षण अनुभव असतो.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण मराठीचा फर्डा सुप्रसिद्ध कथाकथनकार आप्पासाहेब खोत हे संमेलनाध्यक्ष म्हणून निश्चित झाले. आप्पासाहेब खोतांच्या कथाकथनाची आणि कथा लेखनाची सुरुवात भुदरगडच्या भूमीतूनच झाली होती. खोतांनी संमेलनाध्यक्ष पदावरून केलेलं भाषण हे अतिशय चिंतनशील आणि ग्रामीण साहित्यिकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडणारं होतं.

सकाळी साडे आठ वाजता पूर्ण मडिलगे गावामध्ये ग्रंथ दिंडी ची जय्यत तयारी सुरू होती. गावच्या वेशीत कबीर मंदिरा पासून दिंडी सुरू झाली. गावकऱ्यांनी दिंडीसाठी उपस्थित असलेले संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा आप्पासाहेब खोत, स्वागताध्यक्ष व संमेलनाचे प्रायोजक नामवंत उद्योजक मा विनायक राऊत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून उपस्थित झालेल्या साहित्यिकांचे गांधी टोप्या घालून व कुंकवाचा नाम ओढून स्वागत केले.

स्वागतानंतर भारताचे संविधान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानपीठ विजेती ययाती या ग्रंथांना पालखीत ठेवून त्यांचं मान्यवरांकडून पूजन करण्यात आलं. दिंडीमध्ये सर्व अबालवृद्ध स्त्रीपुरूष पारंपारिक वेश परिधान करून मोठ्या उत्साहात सामील झाले होते. सुमारे एक किलोमीटर लांबीच्या या हजारो लोकांच्या दिंडी मध्ये धनगरी ढोल ताशे, टाळ-मृदंगासह वारकरी, चित्ररथ, स्त्री-पुरुषांची लेझीम पथके, दांडपट्टा, महिलांची पारंपारिक गाणी यामुळे मडिलगे गावचे वातावरण पूर्णतः चैतन्यानं भारून गेलं होतं. पालखी पुढे सरकत असताना गावाच्या चौकाचौकात पालखीचं औक्षण केलं जात होतं. फुलांचा वर्षाव केला जात होता.

गावची प्राथमिक शाळा आणि ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाच्या आवारात उभारलेल्या भव्य शामियान्याला गावांचा शाश्वत विकास कसा करावा याचा त्यांच्या ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून वस्तूपाठ देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव देण्यात आलं होतं तर शामियान्यातील विचारपीठाला भुदरगड तालुक्यातील नवोदित साहित्यिकांना नेहमीच पाठबळ देणाऱ्या दिवंगत डॉ विजय निंबाळकर यांचं नाव देण्यात आलं होतं.

१४ एप्रिल, डाॅ आंबेडकरांची जयंती. बौध्द वस्तीत तथागत गौतम बुद्ध व डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत पालखीचं आगमन झाल्यावर मान्यवरांनी ग्रंथ पालखी आणि छ. शिवाजी महाराज, म. फुले, छ.शाहूमहाराज, डाॅ आंबेडकर आणि तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

अक्षरसागर चे अध्यक्ष राजन कोनवडेकर यांनी प्रास्ताविक तर सरपंच गौरी खापरे यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. विनायक राऊत यांनी आपल्या मनोगतात आपण ग्रंथदिंडी आणि एकूणच संमेलनाच्या नेटक्या नियोजनामुळे भारावून गेल्याचे सांगत अक्षरसागरचा सल्लागार सदस्य असल्याबद्दल त्यांना अभिमान वाटत असल्याचं सांगितलं.

उद्घाटन सत्रात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार वितरण करण्यात आले.
उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार :
१. नंदु साळोखे – इपळाप (कादंबरी)
२. अंकुश गाजरे- सारीपाट (कथासंग्रह)
३. शिवाजी सातपुते – दखल-बेदखल (कवीता संग्रह)
४. राजेंद्र उगले – थांब ना रे ढगोबा (बालकाव्य)

विशेष ग्रंथ पुरस्कार –
१. श्रीकांत पाटील – ऊसकोंडी (कादंबरी)
२. दि बा पाटील – नोटबंदी (कथासंग्रह)
३. सिराज शिकलगार – गझलनाद (कवितासंग्रह)
४. मालती सेमले – रानपपाखरं (बालकाव्य)
४. श्रावणी पाटील – आजीनं सांगितलेल्या गोष्टी (बालकथा)

याचबरोबर, सायली खोत यांच्या ‘सायलीची फुले’ या काव्य संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. गारगोटीच्या सानिया सुदेश सापळे हिचा नेमबाजीत राष्ट्रीय संघात निवड झाल्याबद्दल मा. विनायक राऊत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला तर, करडवाडीत पोहोचलेला मरीआईचा रोगाचा गाडा हस्तगत करून केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबद्दल सचिन सुतार, गोविंद पाटील व भिमराव कांबळे यांचा सत्कार डाॅ राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला.

विशेष म्हणजे, मान्यवरांच्या सत्कारासाठी हेल्पर्स ऑफ दी हॅन्डीकॅप्ड, कोल्हापूर संस्थेकडून अपंगांनी केलेले कागदी फुलांचे गुच्छ व ‘उदे ग अंबाबाई उदे’ हे पुस्तक देण्यात आले. या पुस्तकात पुजारी हटाओचा कायदा व यशस्वी चळवळीचा सविस्तर आढावा घेतलेला आहे.

अक्षरसागरच्या वतीने दिला जाणारा ‘भुदरगड साहित्य भूषण’ हा पुरस्कार प्राचार्य डाॅ जयंत कळके यांना बहाल करण्यात आला. तर शाश्वत विकास चळवळ आणि अक्षरसागर च्या संयुक्त विद्यमाने मडिलगे गावच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या श्री धोंडीराम विष्णु मगदूम यांना ‘मडिलगे भुषण’ हा पुरस्कार देण्यात आला.

संमेलनाला आप्पासाहेब खोत येणार आणि ते कथा न सांगता जाणार हे श्रोत्यांच्या दृष्टीने केवळ अशक्य होतं म्हणून, आम्ही आप्पांना कथाकथनाची विनंती केली. कथाकथनकार दत्ता परीट यांच्या सोबतीनं कथाकथनाचा फड भलताच रंगला. दत्ता परीट यांची ‘भाकरी’ आणि आप्पांची ‘महापूर’ या कथांनी भरगच्च अशा संमेलन मंडपा मधील सर्व श्रोत्यांना अक्षरशः रडवलं. डॉ युवराज देवाळे यांनी कथाकथन सत्राचं अध्यक्षपद सांभाळत मराठी कथेवर मार्मिक भाष्य केलं.

संमेलनात शाश्वत विकास चळवळीच्या ध्येय-उद्दिष्टांना अनुरूप असाच परिसंवाद घडवून आणण्याचं ठरलं. महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत डॉ राजेंद्र कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ जालंदर पाटील, डॉ शिवाजी होडगे आणि सुभाष विभुते यांना निमंत्रित करण्यात आलं. ‘शाश्वत मूल्ये जोपासण्यात साहित्याची भूमिका’ या विषयावर झालेला परिसंवाद पराकोटीचा अभ्यासपूर्ण आणि मार्मिक ठरला.

डॉ. राजेंद्र कुंभार यांनी परिसंवादाचा समीक्षण पर आढावा घेत त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठी साहित्याला आजही फारशी वैश्विक मान्यता नसल्याची खंत व्यक्त करून मराठी साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून वैज्ञानिक आणि मानवतावादी वैश्विक मानवी मूल्यांचा जागर करावा असे आवाहन केले. आपल्या श्रेष्ठ समजलेल्या महाकाव्यांमध्ये असलेल्या अंतर्विरोधांची मोठी यादीच त्यांनी समोर मांडली. नेमाडे यांचे साहित्यिक योगदान हे या ‘शतकाचा लेखक’ म्हणावे एवढे निश्चितच सर्वसमावेशक नाही असे परखड मत त्यांनी मांडले.

सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद गोविंद पाटील या भुदरगड तालुक्यातील प्रतिभावान कवीने भूषविले तर विक्रम वागरे या उमद्या कवीनं संमेलनाचे सूत्रसंचालन अतिशय उत्तम पद्धतीने केलं. विठ्ठल कुलकर्णी, कबीर वराळे, स्नेहल कुलकर्णी प्रवीण सूर्यवंशी, मायकेल डिसोजा इत्यादी अनेक नवोदित कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

अशा या भुदरगड तालुक्यात पंचवीस वर्षात प्रथमच आयोजित केलेल्या बहारदार साहित्य संमेलनांमध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. आमदार प्रकाश आबिटकर, मा. के पी पाटील, राहुल देसाई, नंदकुमार ढेंगे, नाथाजी पाटील, शामराव देसाई, ज्येष्ठ पत्रकार डॉ सुभाष देसाई, डॉ आप्पासाहेब फारणे, डी डी चौगुले, प्राचार्य पी व्ही पाटील, जयवंत हावळ, अरविंद मानकर, प्राचार्य अर्जुन आबिटकर, गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, डॉ जी बी कमळकर, बी एम कासार, माधवराव मांडे, शिल्पकार एम डी रावण, उद्योजक सुदेश सापळे डाॅ ए एम पाटील, विकास सावंत या सर्व मान्यवरांनी साहित्य चर्चेचा दिवसभर मनमुराद आनंद लुटला.

संमेलनाच्या सर्वच चारही सत्रांमध्ये ग्रामस्थ आणि दूर दूरहून आलेल्या अनेक साहित्य रसिकांचा उदंड प्रतिसाद होता.

रात्री नऊ वाजता मडिलगे गावच्या आबालवृद्धांच्या अतिशय बहारदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला सारा गाव फुटून आला होता. पंचक्रोशीतील लोकही उपस्थित होते.
तीनच गाणी सादर झाली आणि मोठ्या वळवाच्या पावसाला सुरुवात झाली. अगदी महिनाभर तयारी करत असलेल्या आणि सकाळ पासून जल्लोषात असणाऱ्या सर्व कलाकारांच्या आणि ग्रामस्थांच्या उत्साहावर मात्र शेवटी या पावसानं पाणी फिरवलं.

संमेलनासाठी उपस्थित असलेले लांबून लांबून आलेले साहित्यिक आणि साहित्य रसिक, व ग्रामस्थ सर्वजण दिवसभराचा घेतलेला साहित्यिक आस्वाद आणि मडिलगे ग्रामस्थांनी स्वतःच्या घरामध्ये नेवून दिलेल्या आग्रह पूर्वक दुपारच्या ग्रामीण घरगुती जेवणानं सर्वजण भारावून गेले होते.

मडिलगे खुर्द हे खरंच एक सात्विक वृत्तीचं गाव.
इथं गेल्या वीस वर्षात ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. गावच्या पुढाऱ्यांतील आणि ग्रामस्थांमधील एकोपा आणि जिव्हाळा ही या गावाची खरी ताकद.
निर्मलग्रामसह आदर्श गाव म्हणून अनेक पुरस्कार मिळवलेल्या या गावानं ‘शाश्वत विकास ग्राम’ बणण्याचा निश्चय केला आणि आम्ही या गावाशी जोडले गेलो.

येथील गौरी खापरे, अश्विनी चौगले, सुरेश खोत सर, बी एस खापरे, धोंडीराम मगदूम दादा, सुखदेव मगदूम,नागोजी बिरंबोळे,सुभाष पाटील, रामचंद्र रसाळ, के डी अकोळकर, रामचंद्र अकोळकर, दिनकर कल्याणकर, दत्ता मगदूम, कृष्णात मांडे,अरूण कळंत्रे शशिकांत करडे,शामराव मांडे, नामदेव खापरे इत्यादी मंडळी गावच्या सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असतात. यांच्यासाठी हे साहित्य संमेलन म्हणजे अगदी घरचा उत्सवच बनलं होत.

गेल्या तीन दिवसात समाज माध्यमातून आणि फोनवरून अक्षरसागरच्या या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या नेटक्या आणि बहारदार नियोजनाबद्दल सर्व स्तरातून भरभरून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. अक्षरसागरचं कौतुक होत आहे.
भुदरगडात पून्हा नव्यानं साहित्य चळवळ रूजत आहे.

Related Post

error: Content is protected !!