Thu. Apr 23rd, 2026

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी….!

Spread the love

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी….!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मराठी राजभाषा दिनानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी, लेखक कुसुमाग्रज यांनी आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.

आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा २७ फेब्रुवारी जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

अनेक संतांनी मराठी भाषेतून विविध ग्रंथ साहित्य, भारुड, कथा लिहून प्राचीन काळापासून मराठी भाषा समृद्ध केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी देखील मराठी भाषेचं संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी खूप मोठं योगदान आणि प्रोत्साहन दिलं आहे.

माझा मराठीची बोलु कौतुके

परी अमृतातेही पैजासी जिंके

ऐसी अक्षरे रसिके.. मेळविन

संत ज्ञानेश्वरांनी ‘मराठी’ चा महिमा या ओवी मधून विशद केला आहे. मराठी भाषा अमृतालाही पैजेने जिंकणारी आहे. तिचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक आहे, असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या २२ प्रमुख भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मराठी भाषा आहे. छत्रपती शिवरायांनी मराठी भाषा आणखी समृद्ध व्हावी म्हणून पहिला राजकोष तयार केला आणि या भाषेला राजाश्रय दिला.

मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, तिचं महत्त्व भावी पिढ्यांमध्ये टिकून रहावं, यासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात.  नवोदित लेखक, कवी यांना मराठी साहित्याबद्दल आवड निर्माण व्हावी, स्फूर्ती यावी यासाठी राज्य शासन मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.

खऱ्या अर्थाने मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यायला हवं. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेच..!

मराठी ही खूप प्राचीन भाषा आहे. हजारो वर्षांपासून मराठी भाषा बोलली जात असल्याचे दाखले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठी भाषेच्या गौरवात भर घालण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात.

मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी.. मराठी भाषेला महत्त्व मिळवून देण्यासाठी शासन आणि प्रशासन तर प्रयत्न करत आहेच.. पण यामध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. या कामी सर्वांचं योगदान आवश्यक आहे.

काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याकडं आपण सर्वांनी लक्ष द्यायला हवं.

*एक म्हणजे– बऱ्याच जणांना मराठीमध्ये बोलणं कमीपणाचं वाटतं.. पण ही मानसिकता आपण सगळ्यांनी बदलायला हवी. आपल्या भाषेकडं बघण्याचा दृष्टिकोन आपणच बदलायला हवा. आपल्या मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. बोलताना किंवा लिहिताना मराठी भाषेचा वापर करताना आपण कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगायला नको.*

दुसरं म्हणजे– केवळ कामकाजातच नाही तर दैनंदिन व्यवहारातही आपण मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करायला हवा.

जसं की वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना.. आपण happy birthday म्हणतो,

याऐवजी “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!” असं म्हटलं तर किती प्रेम आणि जवळीकता वाटते.. सध्या मोबाईल, व्हाट्सएपच्या संदेशात देखील good morning, good night, ok असे शब्दप्रयोग सर्रासपणे आपण करतो, याऐवजी आपण शुभ प्रभात, शुभ रात्री, ठीक आहे, हो..  असे शब्द वापरु शकतो, जेणेकरून आपल्या मराठी भाषेचा वापर  वाढेल..

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्या-खोऱ्यातील शिळा…

या कुसुमाग्रजांच्या ओळी आपण सर्वांनी स्मरण करुन मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करुया…. !

हिंदी, इंग्रजी भाषेचं पूरेपूर ज्ञान घेऊन या भाषेमध्ये प्रभुत्व मिळवणं आवश्यकच आहे. पण हे करताना मराठी भाषेचं मनापासून कौतुक करुया…

मराठी म्हणजे अविट असा गोडवा..
मराठी म्हणजे प्रेम…
मराठी म्हणजे अभिमान..
मराठी म्हणजे शौर्य..
मराठी म्हणजे संस्कार..
मराठी म्हणजे आपुलकी..
आणि मराठी म्हणजे.. मराठी म्हणजे.. आपला महाराष्ट्र…!

मराठी राजभाषा दिनानिमित्त एवढंच सांगावंसं वाटतं, ते म्हणजे मराठीचं महत्त्व आणखी वाढण्यासाठी, मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया.. आपल्या मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगुया..! जय महाराष्ट्र…!!
दिलीप निंबाळकर अध्यक्ष पुणे जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायत

Related Post

error: Content is protected !!