शिवसेना आमदाराचा “बारामती ॲग्रो”ला इशारा !
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कन्नडचा सहकारी साखर कारखाना सध्या बारामती ॲग्रोने चालवायला घेतला आहे. कन्नड व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून देखील इथे मोठ्या प्रमाणात ऊस येतो.परंतु ज्या तालुक्यात हा कारखाना आहे, त्या कन्नड तालुक्याला ‘ बारामती ॲग्रो ‘ कडून दुर्लक्षित केले जात असल्याची भावना ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे.
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी बारामती ॲग्रोला इशारा दिला. कारखाना कन्नडचा मग ऊस देखील आधी याच तालुक्यातील शेतकऱ्यांचा घेतला पाहिजे, अन्यथा बाहेरच्या तालुक्यातील एकही गाडी कारखान्यात येऊ देणार नाही, असा इशारा देखील दानवे यांनी दिला.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त शिवसेनेच्या वतीने जिल्हाभरात “शिवसंवाद मोहिम” राबवली जात आहे. कन्नड तालुक्यात संवाद साधतांना येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बारामती ॲग्रोकडून ऊस नेण्याच्या बाबतीत होत असलेल्या त्रासाबद्दलची कैफियत मांडली.
गेल्या काही वर्षापासून कन्नड सहकारी साखर कारखाना हा बारामती ॲग्रो कंपनीने चालवण्यासाठी घेतला आहे. कारखान्याकडून गाळपासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात ऊस आणला जातो. पण तो आणत असतांना कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र वेटिंगवर ठेवले जाते.
घरचाच कारखाना पण ऊस टाकायचा म्हटंल तर त्यांना ताटकळत ठेवले जाते. तर दुसरीकडे बाहेरच्या जिल्ह्यातील ऊसाचे ट्रक रिकामे होऊन जातात. हे समजल्यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी बारामती ॲग्रोच्या व्यवस्थापनाला इशारा दिला.
कारखाना कन्नड तालुकावासियांचा आहे, तेव्हा आधी त्यांचा ऊस कारखान्याने घेतला पाहिजे. कन्नड तालुक्यात एकही ऊसाचे टिपरू शिल्लक राहता कामा नये.
अमित देशमुखांनी केली कल्याण काळेंची पाठराखण :-
जर इथला ऊस शिल्लक असतांना बाहेरचा ऊस कारखान्याने घेतला तर एकही बाहेरची गाडी कारखान्यात येऊ देणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. लवकरच या संदर्भात आपण बारामती ॲग्रोच्या व्यवस्थापनाशी बोलून हा प्रश्न मार्गी लावू, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
राज्यात महा विकास आघाडीचे सरकार असताना कन्नड तालुक्यातील ऊस गाळप व तोडणी वरून ‘ राजकीय घमासान ,पहावयास मिळत आहे. बारामती ॲग्रो हा साखर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या संस्थेचा आहे, तर शिवसेना आमदार अंबादास दानवे व काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी गाळप वरून संघर्ष तीव्र केला आहे.
