बदल अहवाल विशेष मोहिमेत पुणे विभागाचा प्रथम क्रमांक
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी वादरहीत बदल अहवाल निकाली काढण्यास ३० डिसेंबर पर्यंत राज्यव्यापी मोहीमेचे आयोजन केले होते. या विशेष मोहिमेत एकूण आठ विभागांमध्ये पुणे विभागाने ४१२० प्रकरणे निकाली काढून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकावर आपली मोहोर उमटवली आहे.
पुणे विभागांतर्गत अहमदनगर, सोलापूर, सातारा व पुणे शहर व जिल्हा अंतर्भूत आहेत. बृहणमुंबई विभागात सर्वाधिक १५,३४८ विनावाद प्रकरणे प्रलंबित होती. तिथे केवळ २९०८ प्रकरणात निकाल होऊ शकले. मात्र पुणे विभागात त्याखालोखाल ९०११ प्रकरणे प्रलंबित असताना जवळ जवळ ५० टक्के बदल अहवाल निकाली काढण्यात यश आले.
धर्मादाय उपायुक्त राहूल मामू, सहाय्यक आयुक्त -१ अमरदीप तिडके, सहाय्यक आयुक्त -२ राहूल चव्हाण, सहाय्यक आयुक्त -३ राणी मुक्कावार व सहाय्यक आयुक्त -४ प्रशांत चव्हाण यांनी सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांचे मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पाडली.
यापैकी सहाय्यक आयुक्त -२ राहूल चव्हाण यांनी सर्वाधिक ९०३ बदल अहवाल निकाली काढले.
————————————
या विशेष मोहिमेआंतर्गत प्रलंबित असलेले पण वादग्रस्त नसलेले बदल अहवाल निकाली काढण्याबाबत पुण्याच्या पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या वकिलांनी सकारात्मक भूमिका घेऊन पक्षकारांचे प्रबोधन केले. त्यामुळे ज्या संस्थांचे विना वाद बदल अहवाल प्रलंबित होते त्यांच्या विश्वस्तांनी तातडीने कागदोपत्री पूर्तता करून ही मोहीम यशस्वी करण्यास हातभार लावला. अधिकाऱ्यांनीही कार्यपद्धतीत सुलभता ठेवल्याने पुणे विभाग विना वाद बदल अहवाल विशेष मोहिमेत प्रथम क्रमांकावर येऊ शकला.
ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार
अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे
