धर्मादाय आयुक्तालयाचे स्थलांतर
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
मुंबई येथील डॅा. ॲनी बेझंट रोडवर गेली अनेक वर्ष उभे असलेले महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्तांचे मुख्यालय असलेले पाच मजली धर्मादाय आयुक्त भवन आता लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. तेथे सर्व अद्यावत सोईंनीयुक्त नविन इमारत उभी राहणार आहे. संपूर्ण राज्यातील नऊ धर्मादाय विभागांवर देखरेख व प्रशासकीय निर्णय या मुख्य कार्यालयातून घेतले जाता. कामकाजाचा वाढलेला भार व इमारत जुनी झाल्यामुळे ती धोकादायक झाली होती.
याबाबत पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की इमारतीच्या दयनीय अवस्थेबाबाबत मुंबईतील एका वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यातील निर्देशास अनुसरून सरकारने जुनी इमारत पाडून नविन इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
त्यानुसार भाडेतत्वावर सुमारे पंचवीस हजार स्क्वेअर फूट जागा घेऊन धर्मादाय आयुक्त कार्यालय तसेच बृहन्मुंबई विभागाचे न्यास नोंदणी कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे. स्थलांतरीत कार्यालयाचा नविन पत्ता: सास्मिरा इमारत, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई ४०० ०३० असा आहे. सोमवार ४ ॲाक्टोबर पासून स्थलांतरीत इमारतीमधून नियमीत कामकाज सुरू होणार आहे.
