सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत ,
दहीहंडीवरुन म.न.से.चा टोला
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे.
मात्र असं असतानाही ठाण्यामध्ये म.न.से.ने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेत आंदोलन सुरु केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलनाला बसले आहेत.
आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचं पालन करुन साजरा करु द्यावा अशी म.न.से.ची मागणी आहे.
आपल्या मागणीसंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
आपण माननिय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे लक्षात ठेवावं,
असा उल्लेख करत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन सुनावलं आहे.
सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत,
अशी टीका जाधव यांनी केली आहे.
आता भा.ज.पा. सत्तेत असती तर उद्धव ठाकरेंनीच हिंदू हिंदू केलं असतं.
मात्र सत्तेत आल्यापासून ते हिंदू शब्दच विसल्याचा टोला जाधव यांनी लगावला आहे.
दरवर्षी भगवती शाळेजवळच्या मैदानामध्ये मनसेकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातल्याने म.न.से.ने नाराजी व्यक्त करत दहीहंडी होणारच असा पवित्रा घेतलाय.
शिवसेनेला राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही मात्र हिंदूंचे सण साजरे करताना करोनाचा प्रादुर्भाव होतो का ?
असा प्रश्न जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय.
