मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत ?
मंदिरे उघडण्यावरुन भा.ज.पा.चा सवाल
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
महाराष्ट्रात करोना निर्बंधामध्ये सूट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत.
लोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
मात्र महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, भा.ज.पा. आध्यात्मिक समन्वय आघाडीने तर्फे सोमवारपासून राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी भा.ज.पा.चे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
राज्यात नाशिक, पुणे, पंढरपूर आणि नागपूर येथे भा.ज.पा.तर्फे मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारला मंदिरे उघडा अन्यथा आम्ही नियम तोडू असे म्हटले आहे.
“एकीकडे आज श्री कृष्ण जन्माष्टमी असल्याने संपूर्ण देशामध्ये मंदिरे उघडण्यात आली आहेत.
पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढे अधार्मिक का झाले आहेत ?
ते कुणाला कळत नाहीये.
त्यांचा धर्म कुठे गेला आहे हेही कळत नाही.
कुणाच्या दबावाखाली ते काम करत आहेत?
कोणाला खुश करण्यासाठी ते काम करत आहेत हे आम्हाला कळत नाही.
आता जर सरकारने ऐकलं नाही तर आम्ही नियम तोडणार आणि मंदिरे उघडणार.
सरकारला कारावाई करायची ती त्यांनी करावी,
असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भा.ज.पा. आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.
आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.
यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक देखील काढण्यात आलं होतं.
