यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच,
मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे : करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय मंडळांच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत एकमताने घेण्यात आला.
दरम्यान मंडळांना परवानगी मिळविता कोणत्याही कार्यालयात फिरावे लागू नये,
यासाठी मंडळांना ऑनलाइन परवाने देण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक महापालिकेत झाली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेस गटनेता आबा बागुल, आयुक्त विक्रम
कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, सागर पाटील यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, महापालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
त्याबाबतची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ म्हणाले की,
समाजभान जपत यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी राज्यात सर्वात आधी पुणे शहराने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
यंदाही असाच निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी १०८ ठिकाणी फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
यंदा ही संख्या १५० पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन करण्यात आले असून अमोनियम बायकाबरेनेटची खरेदीही यंदा दुपटीने केली जाणार आहे.
घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन घरीच करावे.
त्यासाठी लागणारे अमोनियम बायकाबरेनेट क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल.
