ATM मध्ये पैसे नसल्यास बँकांना दंड! रिझर्व्ह बँकेचा आदेश
सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना निर्देश
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )
एटीएममध्ये पैसेच नसल्यामुळे ग्राहकाचा हिरमोड होतो. अशी घटना ग्राहकाबरोबर वारंवार होत असते. मात्र, आता ग्राहकांना कॅश-आऊट्स एटीएमपासून मुक्ती मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशामुळे एटीएमसंदर्भातला ग्राहकाचा त्रास आता कमी होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना आता एटीएममध्ये वेळोवेळी वेळेवर पैसे भरण्याचे निर्देश दिले आहेत.
एटीएममध्ये पैसे नसतील तर संबंधित बँकेला दंड ठोठावण्यात येणार आहे. तसा नियमच १ ऑक्टोबरपासून आरबीआयकडून लागू केला जाणार आहे. त्यामुळे देशातील बँकांना मोठा दणका बसला आहे. बँकांच्या एटीएममध्ये पैसे नसतात या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत आणि याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे ग्राहकांना मनस्तापाला सामोरं जावं लागत. त्यामुळे बँकांनी आपल्या एटीएम सेवेवर आता अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, असं आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
आरबीआयच्या नव्या नियमानुसार, एखाद्या एटीएममध्ये एका महिन्यात १० तासांहून अधिक काळ पैसे उपलब्ध नसतील तर अशा परिस्थितीत संबंधिक बँकेवर १० हजारांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. काही बँका एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी एखाद्या थर्ड पार्टी कंपनीची सेवा घेतात. पण अशाही परिस्थितीत नियमाचा भंग झाल्यास त्याचा दंड बँकांनाच भरावा लागणार आहे.
