Wed. Apr 29th, 2026

इंदापूरात अवैध दारु विक्रीचा व्यवसाय तेजीत.

Spread the love

इंदापूरात अवैध दारु विक्रीचा व्यवसाय तेजीत.

इंदापूर :

इंदापूर शहर व तालुक्यात अवैधरीत्या देशी तसेच विदेशी दारु विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरु आहे. या व्यवसायाला पोलीस प्रशासनाचे अभय असल्याची चर्चा नागरिकांत सुरु आहे.

सध्या तालुक्यात गावोगावी ढाबा संस्कृती रुढ होत चालली आहे.अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अशी विनापरवाना दारु विक्री जोमात सुरु आहे. गावाजवळच, गावातच दारु मिळत असल्याने अनेक तरुण दारुच्या आहारी गेल्याचे दृश्य आहे.तर दुसरीकडे शहरात काही ठिकाणी चक्क पान टपरी, चहाच्या टपरीवर सुद्धा देशी दारु विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरु आहे. या सुरु असलेल्या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष कसे ? असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित होत आहे. का त्यांचीच या व्यवसायाला मूकसंमती तर नाही ना अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत.

तालुक्‍यातील पुणे- सोलापूर महामार्गावरील भिगवण पासून ते तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या हिंगणगाव पर्यंत, बारामती-इंदापूर या पालखी राज्यमार्गावरील भवानीनगर ते इंदापूर शहरापर्यंत असलेल्या बहुतांशी ढाबे, हाॅटेलांमध्ये अवैधरीत्या,विनापरवाना देशी-विदेशी दारु विक्री केली जात आहे.कोरोना लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये सदर ढाबे-हाॅटेलवाल्यांची चांदी झाली असल्याचे बोलले जात आहे.

सध्या तालुक्यातील खेडोपाडीही देशी दारु विक्री ही खुलेआम होत आहे. याकडेही ग्रामपंचायत, पोलीस पाटील तसेच हद्दीतील पोलीस ठाण्याचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

तरी संबंधित विभागाने तातडीने अशा बेकायदेशीर विनापरवाना दारु विक्रेत्यांवर कडक कारवाई करुन तालुक्यात सुरु असलेल्या प्रकाराला पायबंद घालावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

●  आपल्या आवडीच्या नेत्यांना उद्घाटनाला बोलवा आणि कारवाईपासून बिनधास्त रहा.

हाॅटेल, ढाब्याच्या उद्घाटनाला ताई, दादा, भाऊ, मामा, भैय्या, तात्या नावाच्या व्यक्तीला कार्यकर्त्यांकडून बोलावले जाते. त्यांना जेवू घातले जाते. सदर जेवणावळीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल केला जातो. आम्ही कट्टर राजकीय असल्याचे भासवले जाते. राजकीय पक्षांच्या सावलीला गेले की, अवैध धंदे केले तरी आपले कोणी काहीही करु शकत नाहीत अशा अविर्भावात वावरत असल्याने अवैध धंदे करणारांना एकप्रकारे परवानाच मिळत असल्याचे बोलले जात आहे.

● सध्याचे अवैध दारु विक्रीचे दर पुढील प्रमाणे – ब्लेंडर ४५० रुपये,मॅकडाॅल नं.१ ची किंमत २५० रुपये, किंगफिशर बियर २५० ,राॅयल स्टॅग ३०० रुपये, मॅकडाॅल रम २२०, डाॅक्टर ब्रॅण्डी १९० रुपये, देशी १२० रुपये, हाथभट्टी ८० रुपये हाफ.

Related Post

error: Content is protected !!