इंदापूरात गुटखा विक्री जोमात ; प्रशासनाची डोळेझाक.
इंदापूर शहर व तालुक्यात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री सर्रास सुरु आहे.याकडे पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे डोळेझाक होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
राज्य सरकारने मागील काही वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा निर्णय घेऊन महाराष्ट्रात गुटखा विक्री व उत्पादनावर बंदी घालण्यात आली. परंतु शेजारील परराज्यातून चोरट्या मार्गाने गुटखा आणून तो इंदापूर शहरातील व तालुक्यातील बाजारपेठांमध्ये खुलेआमपणे विकला जात आहे. याविक्रीतून करोडो रुपयांची बेकायदेशीर माया जमवली जात आहे. यातून अनेक गुटखाकिंग गावोगावी तयार झाले आहेत.
सध्या शहर व तालुक्यात किराणा मालाचे दुकान, पान टपरी, जनरल स्टोअर्स, हाॅटेलांमध्ये ही गुटखा सर्रासपणे खुलेआम विकला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यात परगावी जाणाऱ्या गुटख्याच्या मालावर कारवाई होताना दिसत आहे. मात्र तालुक्यात तसेच शहरात विकला जाणार्या गुटख्यावर कारवाई होताना दिसत नाही. जर समजा कारवाई झालीच तर ती तेवढ्यापुरतीच मर्यादीत राहत असून गुटखाकिंग पुन्हा नव्याने खुलेआमपणे गुटखा विकत आहेत. त्यामुळे या प्रकाराला आळा घालणे आवश्यक आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गुटखाकिंगावर कडक कारवाई करावी व तालुक्यात बेकायदेशीर सुरु असलेल्या गुटखा विक्रीला कायमचाच पायबंद घालावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
● मार्च अखेरीस तालुक्यात व शहरात गुटख्याच्या होलसेल व्यापारी तसेच छोटे व्यवसायिक यांच्यावर पोलीस, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यानंतर व्यापारी व विक्रेते यांच्यावर इतर महिन्यांमध्ये कारवाईचे कोणतेच पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे गुटखाकिंग वाल्यांना वर्षभर अवैध मार्गाने पैसा कमविण्याचा परवानाच मिळत असल्याचे बोलले जात आहे.
