दुअबार पेरणीचे संकट,पावसाची दडी;
राज्याचा बहुतांश भाग कोरडा, जलसाठय़ांवर परिणाम……
पुणे : पावसाने दडी मारल्याने आणि आणखी आठ दिवस तरी त्याला जोर मिळणार नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाची टांगती तलवार तर धरणांतील जलसाठा घटत असल्याने पिण्याच्या पाण्यावरही कपातीचे सावट आहे.
महाराष्ट्रासह मध्य भारतातील बहुतांश भाग आणि उत्तर-पश्चिम भागातील राज्यांमध्ये सध्या पावसाने दडी मारली असताना मोसमी पावसाचा देशातील प्रवास राजधानी दिल्ली आणि जवळच्या राज्यांतच रखडला आहे.
गेल्या १४ ते १५ दिवसांपासून त्याने कोणतीही प्रगती केलेली नाही.
आणखी पाच ते सहा दिवस तो रखडण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रात आणखी आठ दिवस तरी मोठा पाऊस होणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
परिणामी पीक-पाण्याच्या चिंतेत भर पडली आहे.
मोसमी पाऊस ३ जूनला केरळमध्ये दाखल झाला.
त्यानंतर त्याने अतिशय वेगाने प्रवास करीत तीनच दिवसांत महाराष्ट्र गाठला आणि पुढील चार ते पाच दिवसांत निम्म्या भारतात प्रगती केली होती.
या काळात राज्यासह इतर भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली होती.
उत्तर-पूर्व दिशेनेही त्याने वेगाने प्रगती करून हिमालयाच्या पायथ्याशी आणि जम्मू-काश्मीर भागांत ११ ते १४ जूनला धडक दिली. या दरम्यानही देशात बहुतांश भागात पाऊस होता.
१९ जूनपर्यंत मोसमी पावसाची प्रगती वेगाने सुरू होती.
या दिवशी त्याने दिल्लीत धडक मारली. पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि चंडीगड आदी राज्यांच्या काही भागांत त्याने प्रवेश केला होता.
उत्तर भागात लवकर पोहोचूनही मोसमी पावसाचा प्रवास सध्या थांबला आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस केवळ हलक्या सरींची शक्यता आहे.
कोकणात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणीच पाऊस होणार आहे.
