सामाजिक

सेवानिवृत्त पीएसआय रतिलाल चौधर यांचे भरतीपूर्व प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन; सायबर सुरक्षा, व्यक्तिमत्त्व विकास व राष्ट्रसेवेचा दिला संदेश

सेवानिवृत्त पीएसआय रतिलाल चौधर यांचे भरतीपूर्व प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन; सायबर सुरक्षा, व्यक्तिमत्त्व विकास व राष्ट्रसेवेचा दिला संदेश

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

“देशसेवा हीच ईश्वरसेवा” हा प्रेरणादायी संदेश देत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले रतिलाल राजाराम चौधर यांनी दि. ११ जुलै २०२६ रोजी सह्याद्री करिअर अकॅडमी, बारामती येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या ३७ वर्षे ४ महिने २९ दिवसांच्या गौरवशाली पोलीस सेवेतले अनुभव कथन करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची भावना जागृत केली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, मोबाईल व सोशल मीडिया व्यसनापासून अलिप्त राहणे, पालक-पाल्यांमधील सुसंवाद, व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, चारित्र्य आणि सकारात्मक जीवनमूल्ये या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन व समुपदेशन केले. आजच्या डिजिटल युगात सजग नागरिक होणे ही प्रत्येक तरुणाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गरीबीशी झुंज देत स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविताना आलेले संघर्ष, यश-अपयशाचे चढ-उतार आणि सेवाकाळातील अनुभव सांगताना त्यांनी मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच यशाचे खरे सूत्र असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले. आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि शिस्त जोपासून ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तंटामुक्ती अभियानातून समाजात शांततेचा संदेश
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानातील आपल्या कार्याचा उल्लेख करत चौधर म्हणाले, “पोलीस म्हणजे केवळ गुन्हे दाखल करणारा अधिकारी नसून समाज घडविणारा घटक आहे.” गावोगावी जाऊन संवादाच्या माध्यमातून वाद मिटविण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या प्रयत्नांतून लोकन्यायालयातील ५,७८० हून अधिक आणि महसूल न्यायालयातील ३,७२८ तंटे मार्गी लागले. तसेच २६४ पती-पत्नींचे संसार पुन्हा एकत्र आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेला वाद अवघ्या दोन तासांत मिटविल्याचा अनुभवही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.

समाजप्रबोधनासाठी सातत्यपूर्ण कार्य, महिला दक्षता समिती, ग्रामसुरक्षा दल, व्यसनमुक्ती अभियान, बालविवाह प्रतिबंध, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, ग्रामसभांमधील जनजागृती आणि सामाजिक सलोखा यांसारख्या अनेक उपक्रमांत त्यांनी सक्रिय योगदान दिले. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३९ गावांमध्ये ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून लोकसहभाग वाढविला. “वादापेक्षा संवाद श्रेष्ठ” आणि “एक गाव – एक गणपती” यांसारख्या उपक्रमांद्वारे सामाजिक ऐक्य दृढ केले. पालखी सोहळ्यात तंटामुक्तीचा संदेश देणारा जनजागृती रथही त्यांनी उभारला.

राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक सन्मान उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी चौधर यांना राष्ट्रपती पुरस्कार, राष्ट्रीय ग्रामीण विकास पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट पोलीस अधिकारी पुरस्कार, सामाजिक रत्न, शांतता पुरस्कार, न्यायरत्न पुरस्कार, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार तसेच कोविड योद्धा सन्मान अशा अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अनेक सन्मान मिळूनही त्यांनी साधेपणा, संवेदनशीलता आणि माणुसकी जपल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते.

विद्यार्थ्यांनी घेतली प्रेरणेची शिदोरी
“उद्याचे भविष्य तुम्हीच आहात. कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणाच्या बळावरच यश मिळते,” असा विश्वास व्यक्त करत चौधर यांनी विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी स्वतःला सक्षम बनविण्याचे आवाहन केले. त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी अत्यंत एकाग्रतेने ऐकले. कार्यक्रमाच्या शेवटी टाळ्यांच्या कडकडाटात अनेक विद्यार्थ्यांनी “आपणही चौधर साहेबांसारखे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख पोलीस अधिकारी बनू,” असा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास सह्याद्री करिअर अकॅडमीचे संस्थाचालक उमेश ननवरे, शिक्षक व कर्मचारी, भावनगरीचे संपादक संतोष शिंदे तसेच मोठ्या संख्येने भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त पीएसआय रतिलाल चौधर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, उत्साहवर्धक आणि राष्ट्रसेवेची नवी प्रेरणा देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *