शहाजीनगर दत्तदेवस्थानात हरिनाम सप्ताहाचा भक्तिभावाने प्रारंभ
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व दशरथ माने यांच्या हस्ते विधी संपन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील श्री दत्त देवस्थानात अखंड हरिनाम सप्ताह व गुरुचरित्र पारायणाचा प्रारंभ शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) अत्यंत शांत, साधेपणाने आणि भक्तिभावाने झाला. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…” या हरिनामाच्या घोषात परिसरात सात्विकता आणि उत्साह दाटून आला.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या हस्ते विना पूजनाने सप्ताहाचा शुभारंभ झाला. सोहळ्याच्या प्रारंभीच देवस्थान परिसरात अध्यात्मिक उर्जेची अनुभूती भाविकांना लाभली.
या कार्यक्रमाचे श्रींचे पौराहित्य गणेश काका वाघ यांनी शास्त्रोक्त रीतीने पूर्ण केले. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, निराभिमा कारखान्याचे संचालक कृष्णाजी यादव, राजेंद्र देवकर, बाजार समितीचे माजी संचालक किरण बोरा, सचिन देवकर, अकलूज कारखान्याचे माजी संचालक सोमेश्वर वाघमोडे, महादेवराव घाडगे, नानासाहेब देवकर, तुकाराम सोनटक्के, धनाजी गायकवाड, अभिजीत देवकर, सोमनाथ मोहिते, पांडुरंग मोहिते, दगडू गायकवाड, विक्रांत गुळवे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सप्ताहातील पहाटेच्या महापूजेचा विधी युवा उद्योजक संजय दोशी आणि माजी संचालक सचिनराव देवकर यांच्या कुटुंबीयांनी भक्तिभावाने पार पाडला.
देवस्थानतर्फे तानाजीराव गायकवाड आणि नीलकंठ मोहिते यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
सायंकाळची भजन संध्या ह. भ. प. शशांगर महाराज बोबडे यांच्या मंडळाने भक्तिरसमय वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमात बोलताना गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ म्हणाले,
“दत्तदेवस्थान हे अध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे. हरिनाम, अन्नदान आणि पालखी सोहळ्यांच्या परंपरा येथे जतन होत आल्या आहेत. गुरुचरित्राच्या ज्ञानातून भक्तिभाव अधिक दृढ होतो आणि शहाजीनगर परिसरात दत्तनामामुळे चैतन्य निर्माण झाले आहे.”
सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनीही दत्तभक्तांना शुभेच्छा देत म्हणाले,
“निराभिमा साखर कारखाना आणि दत्तदेवस्थान या दोन्हीमुळे या भागाची ओळख राज्यभर पोहोचली आहे. देवस्थानाच्या विकासासाठी सोनाई परिवार सातत्याने सहकार्य करत राहील. हरिनाम सप्ताह हा ग्रामीण-शहरी भागातील वैचारिक आणि संस्कारमूल्यांचे अधिष्ठान जपणारा महत्त्वाचा उपक्रम आहे.”
समारंभाचे सुयोग्य सूत्रसंचालन निलेश धापते यांनी केले, तर शेवटी धनाजी गायकवाड यांनी आभार मानले.
