इंदापूरात हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांनी ताकद लावली, पण हे मुद्दे निर्णयाक ठरले

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु राज्यात असणारी सरकारच्या विरोधातील सुप्त लाट इंदापुरातही दिसून आली.
भाऊ-मामांचे प्रयत्न, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विकासाची दूरदृष्टी मतदारांनी नाकारली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांना मानणारा मोठा वर्ग इंदापूर तालुक्यात आहे. या दोघांचे मतदानाचे ठरलेले पॅकेज आहे, महाराष्ट्रात असणारा सरकारच्या विरोधातील रोष, या दोन्ही नेत्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवून गेला.
दोन्ही नेते कार्यकर्त्यांना व मतदारांना आवाहन करत असताना, विधानसभेला तुम्हीच, पण आता काय सांगू नका ही या लोकसभा निवडणूकीत भूमिका मतदारांची व कार्यकर्त्यांची दिसून आली.
राज्यात व देशात विरोधकांनी संविधान धोक्यात असलेला केलेला प्रचार याचा रोष इंदापुरातही मतदानात दिसून आला. यावेळेस दलित समाजाबरोबर मुस्लिम समाजही मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडला.
ईडी कारवाईचा विनाकारण करण्यात आलेला वापर तसेच शिवसेना व राष्ट्रवादी आमदारांची फोडाफोडी, या राजकारणाला महाराष्ट्रात थारा नसल्याचे दिसून आले. तसेच मराठा फॅक्टरचा फटका या निवडणुकीत मतदानात दिसून आला.
