सोलापूरकरांना विरोध डावलत अखेर उजनी धरणाचे पाणी इंदापूर, बारामती तालुक्याला!!
लाकडी-निंबोडी उपसा सिंचन
सचिन तरंगे (शिव कल्याण न्यूज नेटवर्क)
सोलापूरकरांना विरोध डावलत अखेर उजनी धरणाचे पाणी इंदापूर, बारामती तालुक्याला देण्याचा निर्णय “राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे
सोलापूर जिल्ह्यातील अनेक योजना अपूर्ण आहेत,शेतकरी पाण्यावाचून होरपळून निघत आहे,सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी जलाशयातुन इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याचा कुटील डाव रचला आहे,
उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर हा डाव कदापिही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा उजनी धरणं पाणी बचाव संघर्ष समिती ने घेतला आहे
इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिल्याचा आदेश निघाल्यानंतर मोहोळ येथील शासकीय विश्रामगृह त ‘उजनी धरण पाणी बचाव समिती ची’ बैठक पार पडली,
पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन योजना, शिरापूर उपसा सिंचन योजना,सीना माढा उपसा सिंचन योजना, एखरुख उपसा सिंचन योजना, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, सांगोला उपसा सिंचन योजना, सीना भीमा उपसा सिंचन योजना, दहिगाव उपसा सिंचन योजना या उजनी जलाशय वर चालणाऱ्या योजना आजही अपूर्ण असताना इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना साठी राज्य सरकार मंजुरी व कोटयवधी निधी देते,हा सोलापूर करांच्या डोक्यात दगड घालण्याचा डाव आहे,असा आरोप भरणे यांच्यावर करण्यात आला आहे.
. इंदापूर व बारामतीसाठी ७२५० हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्यासाठी लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत ची सविस्तर माहिती सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या दत्तात्रेय भरणे यांनी विविध वृत्तपत्रांना दिली,आणि उजनीच्या पाण्यावर पुन्हा या दोन जिल्ह्यात ‘राजकिय चर्चा’सुरू झाली.
राज्यमंत्री मंडळातील सदस्य व पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूरवर अन्याय करत स्वत:च्या इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी देण्याच्या या निर्णयाच्या विरोधात जिल्ह्यात त्यांच्या विरोधात नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
उजनीचा हा पाणीप्रश्न पेटण्याची पुन्हा एकदा चिन्हे दिसत आहेत.
दत्तात्रेय भरणे हे इंदापूरचे आमदार तर सोलापूरचे पालकमंत्री आहेत.राज्य मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री आहेत.
त्यांनी मागील वर्षी इंदापूर व बारामतीसाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न चालविला असता त्यास सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध केला होता.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा व कार्यकर्ते चा विरोध व परिस्थितीचा विचार करून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या योजनेचा प्रस्ताव रद्द केला होता.
उजनी धरणातील मूळ पाणी आराखडय़ाला हात न लावता तेथील सांडपाणी नेण्याचे नियोजन असल्याचा खुलासा त्यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला होता. परंतु तो खुलासा निराधार आणि खोटय़ा माहितीवर आधारित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इंदापूरच्या लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेस सन २०२१-२२ च्या दरसूचीवर आधारित ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किमतीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही माहिती स्वत: पालकमंत्री भरणे यांनी विविध वृत्तपत्रांना व जाहीर सभांमध्ये दिली आहे.
महत्वाचे म्हणजे लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना ही महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्र या विभागात येते. या योजनेचा उद्भव उजनी धरण पाणलोट क्षेत्रात इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथून असून पहिल्या टप्प्यात ५०.१० मीटर, दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ५१.२० मीटर व ७३.२० मीटर शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलले जाणार आहे.
इंदापूर तालुक्यात दहा गावांतील ४३३७ हेक्टर आणि बारामती तालुक्यात ७ गावांतील २९१३ हेक्टर असे एकूण ७२५० हेक्टर अवर्षण प्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.
यासाठी ०.९० अब्ज घन फूट पाणी उपसा करणे प्रस्तावित आहे. या योजनेच्या लाभक्षेत्राच्या उत्तर बाजूस नवीन मुठा उजवा कालवा तसेच दक्षिण बाजूस नीरा डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र असून या दोन्ही कालव्यांच्या मध्ये सिंचनापासून वंचित क्षेत्रास या योजनेद्वारे सिंचनाचा लाभ होणार आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ही योजना भीमा प्रकल्पाचा भाग असल्याने या योजनेस प्राधिकरणाची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही.अशी भूमिका घेतली आहे.
योजनेचा खर्च मोठे व मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च, १९० सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूक, पाटबंधारे विकास महामंडळाना भाग भांडवली अंशदान, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान गुंतवणूक या लेखाशिर्षांखाली टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
