द्राक्ष उत्पादकांना ठोस दिलासा मिळणेकामी शासनाने किरकोळ नुकसानभरपाई न देता सरसकट कर्ज माफी द्यावी – नितीन आरडे
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटांमुळे सतत तीन वर्षे नुकसानीला सामोरे जात असणा-या द्राक्ष उत्पादकांना ठोस दिलासा
शासनाने किरकोळ नुकसानभरपाई न देता सरसकट कर्ज माफी द्यावी,अशी मागणी शिवशाही शेतकरी संघटनेचे ,प्रदेशाध्यक्ष नितीन आरडे यांनी दै.’नवराष्ट्र’ बोलताना केली.
ते म्हणाले की,नोव्हेबरचा शेवटचे पंधरा दिवस व डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत ढगाळ वातावरण,अवकाळी वादळी पाऊस यामुळे फळबागा विशेषतः विक्रीयोग्य झालेल्या द्राक्षपिकाचे अतोनात नुकसान झाले.गेल्या दोन दिवसांपासून मी व सहकारी अमोल मिसाळ यांनी तालुक्याच्या विविध भागातील द्राक्षबागांना भेटी दिल्या.द्राक्ष उत्पादकांशी चर्चा केली.
ते म्हणाले की,कोरोना, लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णतः नागावला गेला आहे.त्याचा परिणाम लागवडीवर झाला आहे.त्यातून ही तो उभारी धरण्याचा प्रयत्न करतो आहे.तालुक्यात द्राक्षाखालील सरासरी क्षेत्र २ हजार ५२४.१ हेक्टर एवढे आहे.यंदा २ हजार ३७९.४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.
सरासरी क्षेत्रापैकी १४४.७ हेक्टर क्षेत्र घटलेले आहे. तालुक्यात सर्वाधिक द्राक्षशेती सणसर भागात केली जाते.तेथील १ हजार ६२.६ क्षेत्रामध्ये ही १७ हेक्टरने घट झाली आहे. त्या खालोखाल ६९५.४ हेक्टर क्षेत्र असणा-या अंथुर्णे परिसरातील द्राक्षाचे क्षेत्र ४६ हेक्टरने घटले आहे.निमगाव केतकी परिसरात २४१ हेक्टर पैकी २१८ हेक्टरवर द्राक्षांची लागवड झाली आहे. इंदापूर परिसरात २७.३६ हेक्टरने द्राक्षपिकाचे क्षेत्र घटलेले आहे. अशीच बहुतेक ठिकाणची परिस्थिती आहे,असे आरडे व मिसाळ म्हणाले.
द्राक्षाची पूर्ण जोपासना केल्यानंतर पिक हातातोंडाशी आल्यावर यंदा ऐन घटकेला अवकाळी पावसाने घात केला आहे,असे आरडे म्हणाले.
तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी आपण बोललो.त्यांनी गुरुवारी कृषी विभागास पहाणी व पंचनामे करण्याची सूचना दिली आहे.तथापि किरकोळ नुकसान भरपाई न देता,शासनाने द्राक्ष उत्पादक व फलोत्पादकांना सरसकट कर्जमाफी द्यावी,अशी आपली मागणी आहे.या संदर्भात आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत,असे ही आरडे यांनी स्पष्ट केले.
