Thu. Apr 23rd, 2026

ट्रस्ट ॲाडिट दाखल करण्यास मुदतवाढ  

Spread the love

ट्रस्ट ॲाडिट दाखल करण्यास मुदतवाढ

 

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

 

सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक ॲाडिट रिपोर्ट सादर करण्यास महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी सव्वीस नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्र. ५९१ नुसार ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम , १९५० व त्याअंतर्गत नियमांनुसार दरवर्षी सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण करून संपूर्ण ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टल वर ॲानलाईन सादर करावा लागतो. नियमानुसार असा लेखापरीक्षण अहवाल अपलोड झाल्यावर त्याची ॲानलाईन पोहोच प्राप्त होते. ही पोहोच व सर्व विश्वस्तांची नावे, पॅन नंबर व सही असलेल्या फॅार्म ९-ड भरावा लागतो. त्यानंतर ३० सप्टेंबर पूर्वी अपलोड करावा लागतो.

यावर्षी आयकर विभागाच्या पोर्टल मध्ये जून महिण्यापासून बिघाड झाला असल्याने अनेक महिने कोणताही कागदपत्रे अपलोड होत नव्हते. साहजिकच त्यामुळे सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड न झाल्याने त्याची पोहोच मिळू शकली नाही. त्यामुळे आयकर विभागानेही मुदत वाढवली होती. त्या अनुषंगाने धर्मादाय विभागानेही मुदत यापूर्वी ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवली होती. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांना ई-मेल करून कोविड काळातील प्रतिबंधांमुळे अनेक संस्थांची लेखापरिक्षणे झाली नसल्याचे निदर्शनास आणले होते व मुदतवाढीची विनंती केली होती.

या सर्व बाबींची दखल घेऊन ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाकडे व धर्मादाय विभागाच्या वेबसाईट वर अपलोड करून तेथील ॲानलाईन पोहोच व फॅार्म ९-ड सह संपूर्ण ॲाडिट रिपोर्टच्या कागदोपत्री प्रती संबंधित धर्मादाय कार्यालयांमध्ये दाखल करण्यास ३१ डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली आहे.
———————————————————
सर्व सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांना आवाहन करण्यात येते की या वाढवून दिलेल्या कालावधीत वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करून दंडात्मक कारवाई टाळावी.
ॲड. शिवराज प्र कदम जहागिरदार
अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे

Related Post

error: Content is protected !!