ट्रस्ट ॲाडिट दाखल करण्यास मुदतवाढ – ॲड. शिवराज प्र. कदम ( जहागिरदार )
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक ॲाडिट रिपोर्ट सादर करण्यास महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी परिपत्रक क्र. ५९० नुसार मुदतवाढ दिली आहे. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम , १९५० व त्याअंतर्गत नियमांनुसार दरवर्षी सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण करून संपूर्ण ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टल वर ॲानलाईन सादर करावा लागतो. नियमानुसार असा लेखापरीक्षण अहवाल अपलोड झाल्यावर त्याची ॲानलाईन पोहोच प्राप्त होते.
त्यानंतर या ॲानलाईन पोहोचसह संपूर्ण ॲाडिट रिपोर्ट धर्मादाय विभागाच्या वेबसाईट वर ३० सप्टेंबर पूर्वी अपलोड करावा लागतो. यावर्षी आयकर विभागाच्या पोर्टल मध्ये जून महिण्यापासून बिघाड झाला असल्याने गेले तीन महिने कोणतेही कागदपत्रे अपलोड होत नव्हते. साहजिकच त्यामुळे सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड न झाल्याने त्याची पोहोच मिळू शकली नाही. त्यामुळे आयकर विभागाने असे ॲाडिट रिपोर्ट अपलोड करण्यास ३१ डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली. ही बाब पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांना ई-मेल करून निदर्शनास आणली.
अशाप्रकारे धर्मादाय विभागानेही ही मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने सर्व सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांना आवाहन केले आहे की या वाढवून दिलेल्या कालावधीत वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करून दंडात्मक कारवाई टाळावी.
