महिलांसाठीची फिरती स्वच्छतागृहे वापराविना, दुरवस्था झाल्याने धूळखात पडून, भाडेकरारावर घेतलेल्या स्वच्छतागृहांचाही वापर नाही
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे : देखभाल दुरुस्तीअभावी महिलांसाठीच्या फिरत्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे.
त्यामुळे या स्वच्छतागृहांचा महिलांना वापर करता येत नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.
शहराच्या अनेक भागात एकाच जागेवर स्वच्छतागृह असलेली वाहने गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत.
दरम्यान, ही वस्तुस्थिती असताना करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने नव्याने काही स्वच्छतागृहे भाडेकराराने खरेदी केली आहेत.
त्याचाही वापर होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा असल्याचा अनुभव नागरिकांना शहरभर येत आहे.
त्यातच महिला स्वच्छतागृहांचे प्रमाणही पुरुषांच्या स्वच्छतागृहांच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी आहे.
अस्तित्वातील महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून सुरक्षिततेचा प्रश्नही येथे दिसून येत आहे.
ही बाब लक्षात घेऊन महापालिके ने महिलांसाठी खास फिरती स्वच्छतागृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला.
शहराच्या विविध भागात ही सुविधा सुरू करण्यात आली.
मात्र सुविधेनंतर फिरत्या स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती महापालिके कडून नियमित पद्धतीने करण्यास टाळाटाळ सुरू झाली.
त्यामुळे फिरत्या स्वच्छतागृहांची दुरवस्था सुरू झाली आणि पर्यायाने या स्वच्छतागृहे वापराविना पडून राहिल्याचे चित्र पुढे आले आहे.
मुळातच महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचे शहरात अपुरे प्रमाण आहे.
ज्या ठिकाणी महिलांसाठीची स्वच्छतागृहे आहेत,
त्या ठिकाणी दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
त्यामुळे महिला स्वच्छतागृहांचा वापरही तसा कमीच होत आहे.
