गोरगरीब,अन्यायग्रस्तांचे आधारवड युवराज मामा पोळ काळाच्या पडद्याआड !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
रेडा प्रतिनिधी, राहुल बोबडे : इंदापूर येथील आंबेडकरवादी चळवळीतील सुधीर उर्फ युवराज मामा पोळ यांचे दि.२१ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांचे वय ५६ वर्षे होते.
युवराज मामा पोळ यांनी चळवळीतील सुरुवात ‘दलित पॅंथर’ या आक्रमक संघटनेतून केली.नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सन २००४ नंतर राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे मार्गदर्शनाखाली भीमशक्ती सामाजिक संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी आजपर्यंत २० वर्षाहून अधिक काळ एकनिष्ठेने कामकाज पाहिले.इंदापूर तालुक्यात भीमशक्ती संघटनेच्या जवळपास ८० शाखा आहेत.
गोरगरीब,अन्यायग्रस्त,निराधारांचा आधार म्हणून युवराज मामा पोळ यांची तालुक्यात ओळख होती.त्यांनी चळवळीत काम करत असताना जातीभेद केला नाही.जो येईल त्याला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव गुण होता यामुळेच युवराज मामा पोळ यांच्या जाण्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.इंदापूर येथील सध्या अस्तित्वात असलेले शासकीय वस्तीगृह मंजूर करून आणण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,एक मुलगी,तीन भाऊ,एक बहीण असा परिवार आहे
