अखेर दत्त देवस्थान ट्रस्टवर प्रशासक…..
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
प. पू. श्री रामकृष्ण क्षिरसागर महाराज स्थापित अहमदनगर मधील वेदांतनगर, सावेडी येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांचे चेंज रिपोर्ट फेटाळण्याचा आदेश अपीलामध्ये कायम ठेऊन पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त सुनिता तरार यांनी ट्रस्टचे आर्थिक कामकाज पहाण्यास प्रशासक नेमला आहे. महाराजांचे पुतणे व कुटुंब प्रतिनिधी असलेले कायम विश्वस्त मिलिंद क्षिरसागर यांनी सुमारे पंधरावर्षांचा अथक पाठपुरावा करून संजय शिवाजी क्षिरसागर यांची सत्ता संपवली आहे.
रामकृष्ण क्षिरसागर महाराज यांचे ८ सप्टेंबर १९९९ रोजी महानिर्वाण झाले. त्यानंतर हळूहळू पेशाने वकील असलेले कायदेशीर कामांमुळे महाराजांशी संपर्क झालेले संजय शिवाजी क्षिरसागर यांनी आडनाव साधर्म्याचा फायदा घेऊन ट्रस्टवर २००६ साली आपली विश्वस्त म्हणून नियुक्ती करून घेतली. टप्या टप्याने आपल्या मर्जीतील लोकांना विश्वस्त नेमल्याचे दर्शवून क्षिरसागर महाराजांचे पुतणे व कुटुंब प्रतिनिधी असलेले कायम विश्वस्त मिलिंद क्षिरसागर यांना देखील विश्वस्त पदावरून बेदखल केले व आपला कब्जा जमवला. मात्र ही खेळी लक्षात येताच अहमदनगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी कायम विश्वस्त मिलिंद क्षिरसागर यांना काढल्याचा चेंज रिपोर्ट फेटाळून त्यांची उपस्थिती विश्वस्त संभाना अनिवार्य असल्याचा निर्णय दिला.
या नंतरही संजय क्षिरसागर यांनी कायम विश्वस्त मिलिंद क्षिरसागर यांना कोणत्याही विश्वस्त सभेस न बोलवतां मनमानीपणे मर्जीतील विश्वस्त नेमल्याचे दर्शवून २००६ पासून सुमारे सदोतीस चेंज रिपोर्ट अहमदनगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात विनासुनवणी प्रलंबित ठेवले. अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापैंकी काही चेंज रिपोर्ट तातडीने सुनवणीस घेऊन कालबद्ध मर्यादेत निर्णीत करण्याचा आदेश दिला.
त्यानुसार अहमदनगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त गीता बनकर यांनी सुनावणी घेतल्याने १ डिसेंबर २०२० रोजी सुमारे १५ वर्षांनंतर संजय शिवाजी क्षिरसागर व त्यांनी नेमलेल्या विश्वस्तांचे वरील चेंज रिपोर्ट अखेरीस बेकायदेशीर ठरवून फेटाळले.
या सर्व चेंज रिपोर्टचे आदेशांवर संजय क्षिरसागर व इतरांचे वतीने पुण्यातील सह धर्मादाय आयुक्तांकडे अपीले दाखल करण्यात आली होती. मात्र क्रमवारीनुसार अपीले सुनवणीस न घेता स्वतःची पुनर्नियुक्ती करणारा चेंज रिपोर्ट क्रमांक १/२०२१ मधील स्थगिती आदेशांचे अर्ज प्राधान्याने सुनवणीस घेण्याचा आग्रह संजय शिवाजी क्षिरसागर यांनी धरला. सुमारे दीड वर्षांच्या सुनवणी नंतर पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त सुनिता तरार यांनी स्थगिती आदेशांचे अर्ज फेटाळले. तसेच अनेक अपीले प्रलंबित असल्याने दरम्यानचे कालालावधीसाठी ट्रस्टचे सेवकांचे पगार, सरकारी देणी, वीज बील व शासकीय कर भरण्यास अपिलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत अहमदनगर धर्मादाय कार्यालयातील निरिक्षक एस. डी गेजगे यांची प्रशासक म्हणून सह आयुक्त तरार यांनी नियुक्ती केली आहे.
याकामी अपीलकर्त्याकडून ॲड. मनोज वाडेकर व ॲड. भावना पानपाटील तर मूळ हरकतदार व कायम विश्वस्त मिलिंद क्षिरसागर यांचे तर्फे मुख्यत्वे ॲड. शिवराज कदम जहागिरदार व ॲड. अमित टकले यांनी काम पाहिले. इतर हरकतदार मुरलीधर ऋषीपाठक यांचेवतीने ॲड. रोहिणी पवार व अभय ब्रम्हे यांचे ॲड. सागर थावरे हे वकील होते.
उपरोक्त निकालास वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी अपीलकर्त्यांचे वकिलांचे विनंतीनुसार संस्थगित करून चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
———————————-
या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरचा सामान्य माणसाचा विश्वास दृढ झाला आहे. अत्यंत खडतर अशा पंधरा वर्षांच्या परिश्रमांचे चीज झाले. गुरूदेवांच्या अपेक्षेनुसार आता देवस्थानचे कार्य सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
*मिलिंद गोविंद क्षिरसागर*
कायम कुटुंब प्रतिनिधी विश्वस्त
——————————–
या निकालाने न्यायिक प्रकरणे प्रलंबित ठेऊन धार्मिक स्थळांची सत्ता हातात ठेवण्याच्या किळसवाण्या प्रयत्नांना चपराक बसली आहे. प्रशासक नेमणुकीमुळे ट्रस्टचे आर्थिक व्यवहार मर्यादेत राहून पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.
*ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार*
मिलिंद क्षिरसागर यांचे वकील
