Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
इंदापूरात शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रविण मानेंच्या प्रचारात सहभागी - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

इंदापूरात शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रविण मानेंच्या प्रचारात सहभागी

Spread the love

इंदापूरात शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रविण मानेंच्या प्रचारात सहभागी

screenshot 20241101 111932 instagram

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर विधानसभा निवडणूक २०२४ करीता चुरशीच्या लढती होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे तर हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षातून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले प्रविण माने यांचे तगडे आव्हान आजी, माजी आमदारांना आहे तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व भरतशेठ शहा यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.

इंदापुरात विधानसभा २०२४ चे राजकीय वातावरण तापलेले आहे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी दोन्ही उमेदवाराकडून होत आहेत.दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोघातच प्रचारादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत.या दोघांच्या आरोप प्रत्यारोपात अपक्ष उमेदवार प्रविण माने यांच्यावर अद्याप आरोप प्रत्यारोप कुठल्याही सभेत झालेले दिसून येत नाहीत.त्यामुळे इंदापुरातील राजकीय संघर्ष भरणे-पाटील यांच्यातच पहावयास मिळत आहे.

अपक्ष उमेदवार प्रविण माने यांनी आजी-माजी आमदारांवर निशाना साधत ‘घर टू घर’ प्रचाराला सुरुवात केलेली आहे.हर्षवर्धन पाटील यांनी ०७ ऑक्टोबर रोजी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.प्रवेश करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश स्वीकारत व्यासपीठावर हजेरी लावली.तर काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशास विरोध दाखवत व्यासपीठावर गैरहजर राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी होणार हे त्याच दिवशी दिसून आले होते.त्याच दिवशी सायंकाळी प्रविण माने,आप्पासाहेब जगदाळे,भरतशेठ शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली व ११ ऑक्टोबर रोजी परिवर्तन मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीस विरोध करत आमच्यापैकी कोणाही एकाला पक्षाकडून उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी मेळाव्यात केली आणि सर्वांच्या विचाराने पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवारी अर्ज दाखल करू असे या मेळाव्यास आश्वासित केले.त्यानंतर प्रविण माने यांनी २३ ऑक्टोबर रोजी शक्ती प्रदर्शन करीत अपक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केला.हा अर्ज दाखल करीत असताना ११ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या परिवर्तन मेळाव्यातील प्रमुख आप्पासाहेब जगदाळे,भरतशेठ शहा यांची गैरहजेरी दिसून आली.

त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत २४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन अर्ज एबी फॉर्मसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षामार्फत शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला.त्याच वेळेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आप्पासाहेब जगदाळे,भरतशेठ शहा हे पक्षामार्फत उपस्थित राहतील असा अंदाज होता परंतु अनेक राजकीय तज्ञांचा तो अंदाज फेल ठरला.त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे,भरतशेठ शहा पक्षविरोधी भूमिका घेतात काय? याची चर्चा तालुक्यात सुरू झाली.परंतु २९ ऑक्टोबर रोजी आप्पासाहेब जगदाळे व भरतशेठ शहा यांनी त्यांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत पत्रकार परिषद घेत दोन दिवसात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कोणाला पाठिंबा द्यायचा? याबाबतचा निर्णय जाहीर करू असे पत्रकार परिषदेत सांगितले.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील आप्पासाहेब जगदाळे,भरतशेठ शहा हे नेमके पक्ष विरोधी भूमिका घेणार की पक्षाचा आदेश पाळून पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील काही पदाधिकारी बंडखोर अपक्ष उमेदवार प्रविण माने यांचा प्रचार करताना दिसत आहेत.असे असताना पक्षाकडून मात्र त्यांच्यावर अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे इंदापूर शहरातील व ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध प्रचार करीत असले प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इंदापूर तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष ॲड.तेजसिंह पाटील हे पदाधिकाऱ्यांवर पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान पक्षाचे तालुकाध्यक्ष यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Related Post

error: Content is protected !!