निष्ठावंतांच्या परिवर्तन मेळाव्यास इंदापुरात ऐतिहासिक गर्दी

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क ) प्रदिप तरंगे, दि.११ :
इंदापूर येथे राष्ट्रवादी (शरद पवार) निष्ठावंत नाराज गटाचा आज शुक्रवारी (दि.११) परिवर्तन मेळावा पार पडला. या मेळाव्यात इंदापूर तालुक्यातील जनतेने अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने यांना केला. जनतेच्या आग्रहा नुसार अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली.आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही असे सांगण्यात आले.
यावेळी परिवर्तन मेळाव्यास इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. इंदापूरच्या इतिहासातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडल्याची चर्चा होती.
यावेळी तालुक्याच्या चौफेर विकासासाठी परिवर्तन घडवण्याचे आवाहन प्रवीण माने यांनी केले. निरा डावा कालवा, खडकवासला कालवा, उजनी धरण, निरा नदी यांच्या पाण्याचे प्रश्न आजही भेडसावत असून ते सोडवण्यासाठी परिवर्तन घडवा असे त्यांनी आवाहन केले. तालुक्यातील जनतेचा सेवक म्हणून काम करण्याची संधी उमेदवाराला द्यावी असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सोनाई ग्रुपचे अध्यक्ष दशरथ माने, पीडीसीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरत शहा, बाबासाहेब चौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय फडतरे, कांतीलाल झगडे, शकील सय्प्रयद ,दीपमामा जगदाळे, तुषार जाधव, अमोल मुळे, सुनील खाडे, हनुमंत सानप उपस्थित होते.
