Fri. Apr 17th, 2026

ट्रस्ट ॲाडिट सादर करण्यास राहिले दहा दिवस

Spread the love

ट्रस्ट ॲाडिट सादर करण्यास राहिले दहा दिवस

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केलेले ताळेबंद धर्मादाय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करून त्याच्या प्रती ३० सप्टेंबर पर्यंत स्थानिक धर्मादाय कार्यालयात दाखल करणे महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था कायद्याच्या कलम ३२ नुसार अनिवार्य आहे. सनदी लेखापालाकडून (चार्टर्ड अकौंटंट) लेखापरीक्षण केलेले ताळेबंद ॲानलाईन पद्धतीने धर्मादाय आयुक्तांचे संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असते. त्यासाठी संबंधित ट्रस्टचा युजर आय डी व पासवर्ड स्थानिक धर्मादाय कार्यालयाच्या लेखा शाखे कडून प्राप्त करून घेता येतो. अहवाल ॲानलाईन सादर केल्यावर त्याची पोहोच मिळते. अनुसूची ‘९ ड’ नुसार सर्व विश्वस्तांचे पॅन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. ट्रस्टला सर्व मार्गाने मिळणाऱ्या देणग्यांबाबतचे सर्व स्त्रोत नमूद केलेले सनदी लेखापालांच्या प्रमाणपत्रासहीत या ताळेबंदांच्या प्रती स्थानिक धर्मादाय कार्यालयात आर्थिक वर्ष संपल्यापासून सहा महिन्याच्या आत म्हणजेच ३० सप्टेंबर पूर्वी दाखल करणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था नियम १९७१ मधील नियम १७, १८ व १९ नुसार लेखापरीक्षकास ट्रस्टची सर्व हिशोब पुस्तके, किर्द, खतावणी, खर्चाच्या पावत्या, व्हाऊचर्स व बीले तसेच संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेची इत्तंभूत माहिती विश्वस्थांनी लेखापरीक्षकास देणे बंधनकारक आहे. लेखापरीक्षकाच्या अहवालात संस्थेची खाती नियमितपणे आणि कायद्याच्या तरतुदींनुसार ठेवली जातात की नाही, उत्पन्न व खर्चाच्या पावत्यांचा व रोख शिल्लक व बॅंक खात्यांवरील जमा रक्कम, स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण व त्यातील बदल वेळोवेळी प्रादेशिक कार्यालयाला कळवले गेले असल्याबाबत माहिती नमूद असायला हवी. विशेषतः मागील लेखापरीक्षण अहवालात नमूद केलेल्या दोष आणि अयोग्यतेचे योग्य प्रकारे निरसन केले गेले आहे का याची टिपण्णी द्यावी लागते. ट्रस्टची कोणतीही मालमत्ता किंवा निधीचा ट्रस्टच्या उद्देशाव्यतिरिक्त खर्च केला गेला आहे का, मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत का याचीही माहिती या अहवालात असणे अपेक्षित आहे.

कलम ३५ च्या तरतुदींच्या विरोधात सार्वजनिक ट्रस्टचा कोणताही पैसा गुंतवला गेला आहे का अथवा कलम ३६ नुसार धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगी शिवाय ट्रस्टच्या स्थावर मिळकतीचे हस्तांतरण झाले आहे काय याचा खास बाब म्हणून उल्लेख करून लेखापरीक्षकाने त्याच्या अहवालाद्वारे धर्मादाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणे महत्वाचे आहे. तसेच ट्रस्टच्या व्यवस्थापनात असलेली कोणतीही अनियमिता, बेकायदेशीर किंवा अयोग्य खर्च, सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीचे पैसे किंवा इतर मालमत्तेच्या अपव्याची, नुकसानीची किंवा गैरवापराची माहिती लेखापरीक्षण अहवालात असणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर विश्वस्तांची कमाल आणि किमान संख्या राखली आहे की नाही आणी सर्वात महत्वाचे म्हणजे विश्वस्तांपैकी कोणीही ट्रस्टचा कर्जदार आहे का किंवा ट्रस्टच्या गुंतवणुकीत वा मालमत्तेमध्ये कोणत्याही विश्वस्तांचे हितसंबंध आहेत का याची सुस्पष्ट माहिती लेखापरीक्षण अहवालात असणे आवश्यक आहे.
—————————————
वार्षिक लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर करणे हे विश्वस्थांच्या पारदर्शक कारभाराचे प्रमाण आहे. यात कसूर केल्यास विश्वस्तांवर कारवाई होऊ शकते.
*ॲड. शिवराज प्र.कदम जहागिरदार*
माजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे

Related Post

error: Content is protected !!